आपलं नवे शहर वर्धापनदिन विशेष लेख

खऱ्या अर्थानं ‘आपलं' वाटणारं वृत्तपत्र

सर्वंकष बातम्या, निःपक्षपाती दृष्टीकोन, सर्वसमावेशक, कसदार लेखन, वाचक स्नेही उपक्रम आदि वैशिष्ट्यांमुळे नवे शहर हे दैनिक खऱ्या अर्थानं ‘आपलं' झालं आहे. आज पनवेल ठाणे व उलवेला जोडणारी रेल्वे, होऊ घातलेल्या दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी या साऱ्याचा एक डोळस साक्षीदार म्हणून ‘नवे शहर'ने भूमिका बजावली आहे. नवी मुंबईत घडणाऱ्या प्रत्येक बाबीची जागरूक आणि संवेदनशीलतेने नोंद घ्ोणारे हे एक वृत्तपत्र आहे.

नवी मुंबई शहराची गोष्ट वेगळी आहे. कोणतंही गाव घ्ोतलं तर  आधी माणसं, मग घरं, मग रस्ते लाईट पाणी अशा सुधारणा होत जातात. नवी मुंबई शहर याउलट पद्धतीने उदयास आले. इथे आधी रस्ते, दिवे, पाणी, घरं मग माणसं आली. असं हे शहर उक्तं, रेडिमेड म्हणता येईल असं आहे. अर्थातच माणसं आली की अनेक सांस्कृतिक, धार्मिक, प्रादेशिक, भाषिक, सामाजिक, साहित्यिक संस्थांचा उदय झाला. त्यामध्ये अनेक वृत्तपत्रं सुद्धा नव्याने सुरू झाली. त्यात महत्त्वाच्या व आजपर्यंत टिकून राहिलेल्यांत १ मे १९९४ रोजी साप्ताहिक म्हणून सुरू झालेल्या ‘आपलं नवे शहर' या वृत्तपत्राचं नाव घ्यावे लागेल.या वर्तमानपत्राचे मालक श्री. कैलाश गिंदोडिया तर प्रकाशक श्री. शिव गिंदोडिया आहेत. नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात येण्याआधीचा तो काळ होता. त्यावेळी अंक ८ किंवा १२ पानी टॅब्लॉईड आकारात असायचा..काही कालावधीतच वाचकांच्या लक्षात आलं.. नव्यानं सुरू झालेली वर्तमानपत्र कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय व्यक्ती-विचारांशी बांधील असल्याचे लक्षात येऊ लागले. मात्र या वृत्तपत्रानं सर्वांचं लक्ष वेधलं कारण हे स्वतंत्र, संतुलित, सर्वसमावेशक बातम्या, लेख यात वाचायला मिळू लागले. शिवाय स्थानिक घडामोडींची भूक भागवणारेही ते होते..  

मी आमच्या मॉडर्न कॉलेजच्या बातम्या अनेकदा वाशी प्लाझा येथे प्रत्यक्ष नेऊन देत असे. त्या नवे शहरमध्ये यायच्या. स्टाफरुम, ग्रंथालय, प्राचार्य केबिनमध्ये नवे शहरच्या प्रती सगळीकडे असायच्या. हेच चित्र सगळ्या आस्थापनात आजही दिसते. किंबहुना आज दर्जेदार मजकूर देणारं वृत्तपत्र आमच्याकडे आहे हे मिरवण्याचा भावही कांहीं वेळा दिसून येतो. १५ डिसेंबर २००९ पासून साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर झाल्यानंतर वाचकांना रोजच्या रोज ताज्या घडामोडी वाचायला मिळू लागल्या. आता वाशी रेल्वेस्थानकाजवळच्या रियल टेक पार्क इमारतीच्या १३ व्या मजल्यावरील कार्यालयातून काम सुरु आहे.

मराठी माणसांचं सांस्कृतिक केंद्र मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळासारख्या संस्था, साठहून जास्त स्वयंसेवी संस्थांचं एकच विचारपीठ असणारे ‘नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था,' २९ गावे, ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टयातील विविध कारखाने, सिडकोच्या विविध नागरी वसाहतींनी बनत असलेली अशी त्यावेळची नवी मुंबई. जून १९९२ साली उपनगरी रेल्वेगाडी नवी मुंबईत आली. आज पनवेल ठाणे व उलवेला जोडणारी रेल्वे, होऊ घातलेल्या दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी या साऱ्याची एक डोळस साक्षीदार म्हणून ‘नवे शहर'ने भूमिका बजावली आहे. नवी मुंबईत घडणाऱ्या प्रत्येक बाबीची जागरूक आणि संवेदनशीलतेने नोंद घ्ोणारे हे एक वृत्तपत्र आहे.
सकस, दर्जेदार लेखन

नोव्हेंबर १९९९ पासून प्रसिद्ध स्तंभ लेखक राजेंद्र घरत यांची ‘मुशाफिरी' ही लेखमाला सुरु झाली. ती एवढी लोकप्रिय झाली की गेली २४ वर्षे अखंडपणे लेखमाला आजतागायत सुरु आहे. याचे विषय सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित असतात.  राजेंद्र घरत यांचे लेखन विचारप्रवर्तक असल्याने त्यात वाचकांची अभिरुची सुसंस्कारित करण्याची किमया घडते. ओघवत्या भाषेची त्यांना विलक्षण देणगी असल्याने त्यांच्या प्रत्येक लेखाला भरभरून दाद समाजमाध्यमाद्वारे मिळत असते. भिमराव गांधले, प्रविण पुरो यांचं राजकीय, सामाजिक विषयावरचं भाष्य वाचकप्रिय झाले आहे. कविवर्य साहेबराव ठाणगे, संध्या यादवाडकर यांचे नियमित स्तंभलेखन वाचकांना समृद्ध करणारे आहे. इकबाल मुकादम, प्रा. डॉ. अजित मगदूम यांच्यासह डॉवटर फॉर बेगर्स डॉ. अभिजित सोनवणे, गजआनन म्हात्रे, ज्योतिका हरयाण अशा अनेकांचं लेखन योगदान मिळत असते. विशेष म्हणजे निवडक पुस्तकांचे परीक्षण तसेच काही प्रवासवर्णनेही ‘नवे शहर' मधून वाचायला मिळतात.

‘आपलं नवे शहर'ने नव्या काळाशी सुसंगत अशी पावले टाकली आहेत. अंकातील लेख, बातम्या नवे शहर वेब साईट वर उपलब्ध आहेत. इंस्टाग्राम, टि्‌वटरही ते कार्यरत आहे. आपलं नवे शहर फेसबुक पेज व नवे शहर युट्यूब चॅनेल वरून नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पनवेल, उरण, कल्याण परिसरातील नामवंत, गुणवंत व्यक्तीमत्वांच्या २०० हून अधिक मुलाखती प्रसारित झाल्या आहेत हा एक मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवा त्यांनी परिश्रमपूर्वक मिळवला आहे व त्यांना दर्शकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वंकष बातम्या, निःपक्षपाती दृष्टीकोन, सर्वसमावेशक, कसदार लेखन, वाचक स्नेही उपक्रम आदि वैशिष्ट्यांमुळे नवे शहर हे दैनिक खऱ्या अर्थानं ‘आपलं ' झालं आहे.
शैलेश जाधव (संपादक), नंदकुमार ठाकूर (उपसंपादक), राजेंद्र घरत (उपसंपादक) आणि टीमला वर्धापन दिनानिमित्त अनंत शुभेच्छा!
डॉ अजित मगदूम, बेलापूर. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भारतातील शिल्पधन : महाबलीपुरम मंदिर (भाग-२)