29 जून ते 13 जुलै या कालावधीत मनाई आदेश जारी
ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, घरणे, सभा, उपोषणे यांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सद्या विविध आंदोलने सुरु असल्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधीत आदेश ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी 29 जून ते 13 जुलै या कालावधीत मनाई आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालील कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहिर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इ. कृत्यांना या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे.