नवी मुंबई विमानतळ आवारात अंतुलेंसह दि.बा.पाटील यांचे स्मारक उभारण्याची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबई विमानतळाच्या आवारात ‘महाराष्ट्र’चे माजी मुख्यमंत्री लोकनेते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आणि प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) उभारण्याची मागणी ‘एमआयएम महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडी’चे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

मुंबईतील विमानतळावर वाढत असलेला ताण आणि त्यामुळे आकाशात होणारी वाहतूक काेंडी यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने रायगड जिल्ह्यात नवी मुंबई विमानतळाचे काम सुरु केलेले आहे. रायगड मधील जनतेलाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच जनतेला माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आणि प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील या रायगडच्या सुपुत्रांचे नाव आणि कार्य परिचित आहे. या सुपुत्रांनी रायगडच्या भूमीत जन्म घतला खरा; पण त्यांचे कार्य राज्यभर गाजले. त्यांच्याच आदर्शावर वाटचाल करत जनसेवेचे कार्य आम्ही करत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. लंडनहून भवानी मातेची तलवार परत आणण्यासाठी त्यांनी दिलेले आणि केलेले कार्य महाराष्ट्राच्या भूमीवर कोणताही महाराष्ट्रीयन माणूस विसरु शकत नाही. याशिवाय लोकनेते दि. बा.पाटील यांच्यामुळे नवी मुंबईतील ग्रामस्थांचे, प्रकल्पग्रस्तांचे आज अस्तित्व दिसत आहे, ते कोणीही नाकारु शकत नाही. दि. बा. पाटील यांच्यामुळे साडेबारा टक्के योजनेतून ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळाले, त्यातून त्यांना निवासी आणि वाणिज्यिक सुविधा मिळाल्याने प्रगती साधता आली. दि. बा. पाटील यांनी खासदार आणि आमदार म्हणून केलेले कार्य जनहितैषी आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे रायगडच्या जमिनीवर उभ्या राहत असलेल्या विमानतळाच्या आवारात माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर.अंतुले आणि लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळे) राज्य सरकारने उभारणे आवश्यक असून त्याखाली यांच्या कार्याचाही आढावा शिलालेखावर कोरण्यात यावा. जेणेकरुन विमानतळावर येणाऱ्या प्रत्येकाला रायगडच्या या सुपुत्रांचे कार्य समजेल आणि त्यापासून त्यांनाही प्रेरणा घता येईल.
दरम्यान, सरकारने सदर दोघा लोकनेत्यांचा स्मारक नवी मुंबई विमानतळ आवारात उभारण्याचा निर्णय न घतल्यास रायगड आणि ठाण्यातील जनता या विमानतळाचा कोणालाही वापर करु देणार नाही. तसेच या विमानतळावरुन एकही विमान उडू देणार नाही याचीही आपण जाणिव ठेवावी. त्यामुळे आमच्या मागणीमागील कळकळ पाहता लवकरात लवकर स्मारकाबाबतचा निर्णय जाहिर करावा, अशी विनंतीही हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

ऐरोली प्रभाग क्रमांक १५ मधील प्रस्तावित कामे थांबविण्यात यावी