सिडको उभारणार कळंबोली येथे 800, कांजूरमार्ग येथे 2000 खाटांचे
नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये होत असलेली कोविड-19 रुग्णांची वाढ लक्षात घेऊन, अधिकाधिक रुग्णांवर तातडीने व प्रभावी उपचार करता यावेत याकरिता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबईतील कळंबोली येथे 800 व मुंबईतील कांजूरमार्ग येथे 2000 खाटांचे सुसज्ज समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) उभारण्यात येणार आहे. कळंबोली केंद्रातील 800 खाटांपैकी 690 खाटा या ऑक्सिजनयुक्त तर 110 खाटा या अतिदक्षता विभागाकरिता असणार आहेत. कांजूरमार्ग केंद्रातील 2000 खाटांपैकी 1400 खाटा या ऑक्सिजनयुक्त, 400 खाटा ऑक्सिजनविरहित आणि 200 खाटा या अतिदक्षता विभागाकरिता असणार आहेत.
कोविड-19 महासाथीमुळे रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या हद्दीत सिडकोमार्फत अतिरिक्त कोविड केंद्रे उभारण्यात यावीत, अशी विनंती अनुक्रमे पनवेल आणि बृहन्मुंबई महापालिकाकडून राज्य शासनाला करण्यात आली होती. तसेच कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येला तातडीने व प्रभावी उपचार पुरविण्याकरिता मुंबई आणि नवी मुंबईतील अधिकाधिक कोविड रुग्णांवर उपचार करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सिडकोला नवी मुंबईतील कळंबोली आणि मुंबईतील कांजूरमार्ग येथे समर्पित कोविड केंद्र उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सिडकोकडून कळंबोली येथील भारतीय कापूस महामंडळाच्या गोदामामध्ये 800 खाटांचे तर कांजूरमार्ग येथे 2000 खाटांचे कोविड केंद्र लवकरच उभारण्यात येणार असून त्यासाठीच्या प्रारंभिक कामांना सुरुवात झाली आहे. कळंबोली येथील केंद्र उभारण्यात आल्यानंतर पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.