मुंबई पाठोपाठ नवी मुंबई विमानतळ अदानीकडे

नवी मुंबई विमानतळ बनवण्याची जबाबदारी आता अदानीवर  

अदानीचा हिस्सा ७४ टक्के तर सिडकोचा हिस्सा २६ टक्के 

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे जीव्हीके  कंपनीकडे असलेले सर्व अधिकार अदानी समुहाकडे हस्तांतरित  झाले असल्यामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ७४ टक्के भागधारक म्हणून अदानी कंपनीच्या मालकी हक्कावर सिडकोने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन आता अदानी समुहाकडे गेले आहे. नुकत्याच पार पडलेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 

काही महिन्यांपूर्वी जीव्हीकेकडे असलेल्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. (एनएमआयएएल)चे मालकी हक्क अदानी समुहाकडे हस्तांतरित झाले आहेत. त्यामुळे देशातील सहा विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ठेका असलेल्या अदानी समुहाकडे आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे ७४ टक्के समभाग नावावर झाले आहेत. परिणामी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे भवितव्य आता अदानी समुहाच्या हातात गेले आहे.    

सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्वावर विकसीत केले जाणारे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून उभारले जाणार आहे. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या या विमानतळ प्रकल्पाचे काम मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीके समुहाला देण्याबाबत २४ ऑक्टोबर २०१७ च्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. 

या प्रकल्पासाठी त्यावेळेस १६ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असला तरी विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनास झालेला उशीर गृहित धरल्यास विमानतळाचा खर्च वाढण्यासह नवी मुंबईतून विमानोड्डाण होण्यास आणखी कालावधी लागणार असल्याचे बोलले जात आहे. सदर विमानतळ प्रकल्पातील ७४ टक्के समभाग जे जीव्हीके कंपनीकडे होते ते आता अदानी समुहाकडे गेले असून २६ टक्के समभाग हे सिडकोचे राहणार आहेत. या प्रकल्पासाठी सिडकोने स्वतःची जमीन दिली असून संपुर्ण विमानतळ उभारणीचा खर्च आता अदानी कंपनी उचलणार आहे.    

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि मिआल या दोन्ही कंपन्या जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग कंपनीच्या उपकंपन्या होत्या. तर सिडको नोडल एजन्सी म्हणून या प्रकल्पाचे काम पाहत होती.  

जीव्हीके आणि अदानी समुहामध्ये कंपनीचे समभाग खरेदी-विक्री संदर्भात कोणताही व्यवहार झाला असला तरी जीव्हीके आणि सिडको दरम्यान झालेल्या सवलत करारात (कंन्सेशनल ऍग्रीमेंटमध्ये) नमूद अटी शर्तीनुसारच जीव्हीकेचे समभाग घेणाऱ्या अदानी कंपनीला आता नवी मुंबई विमानतळाचे काम करावे लागणार आहे. 

देशात गत वर्षभरापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विमानतळ विकासपुर्व कामे पुर्णत्वास जावू शकलेली नाहीत. जीव्हीकेसोबत झालेल्या सवलत करारनाम्यानुसार डिसेंबर २०२१ पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी जीव्हीकेवर देण्यात आली होती. परंतु, आजतागायत विमानतळाच्या कामाची एक वीट सुद्धा लागलेली नाही. 

११६० हेक्टर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या या विमानतळाची ९९.५५ टक्के जागा जीव्हीकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदर जागा जीव्हीकेच्या ताब्यात देताना सिडकोने विमानतळाच्या जमिनीवर ५.५ मीटर उंचीचा मातीचा भराव टाकून जमीन समांतर करून जीव्हीकेच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे अदानी समूहाला आता विमानतळाचे काम सुरू करण्यापूर्वी ५.५ मीटर उंचीचा मातीचा भराव ८.५ मीटर उंचीवर घेऊन जावा लागणार आहे. आणि त्यानंतरच विमानतळाचे काम सुरू करावे लागणार आहे.

त्यामुळे नवी मुंबई विमानतळ प्रकल्प पुर्ण करण्यासाठी भविष्यात सिडको व राज्य शासनाला अदानी कंपनीला विमानतळ पूर्ण करण्यासाठी नवीन तारखा द्यावा लागणार यात काही शंका नाही. नवीन तारखा देण्याबाबत सिडको संचालक मंडळाने अद्याप निर्णय घेतलेला नसून तो लवकरच घेण्याची शक्यता आहे. तुर्तास नवी मुंबई विमानतळावर अदानीच्या मालकीवर मंजुरीची मोहर उठवून सिडको संचालक मंडळाने सदरचा प्रस्ताव आता प्रोजेक्ट मॉनिटरिंग ॲण्ड इम्प्लिमेंटेशन कमिटी (पीएमआयसी) व शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. 

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एपीएमसीत छत्री वाटप