सागरपुत्र शुभम वनमाळी
लहानपणी अस्थमाचा त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांनी उपाय म्हणून दिलेला पोहण्याचा सल्ला, त्यानंतर पोहण्याच्या सरावातून अस्थमा बरा झाला. पण, याच पोहण्याच्या सरावातून ते स्विमींग एक ध्येय बनले आणि या ध्येयप्राप्तीतून सागरी जलतरणपटू म्हणून उदयास येत इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला नवी मुंबईकर, साहसी क्रीडापटू म्हणून महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने केलेला गौरव, इंग्लिश खाडी आणि जिब्राल्टरची समुद्रधुनी पोहून गेल्याने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झालेली यंगेस्ट स्वीमर ऑफ द इयर नाेंद यासह इतर विविध पुरस्कारांना गवसणी घातलेल्या नवी मुंबईकर जलतरणपटू शुभम धनंजय वनमाळी याच्याशी ‘आपलं नवे शहर’ चे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी साधलेला संवाद.
विशेष म्हणजे ‘आपलं नवे शहर’ तफे वर्धापन दिनी शुभम वनमाळी यांचा क्रीडा क्षेत्रासाठी ‘नवे शहर सन्मान-२०१५’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सागरी जलतरण प्रकारात भारताचे नाव विश्वस्तरीय व्हावे यासाठी आपले प्रयत्न सुरु असून त्यासाठी जगातील नामांकित जलतरणपटुंशी संवाद सुरु असल्याचे शुभम वनमाळी याने या संवादात सांगितले.
► जलतरणमध्ये तुझा कौटुंबिक इतिहास आहे का?
- माझ्या कुटुंबात तसेच आई-वडील कुणीही स्वीमर नाहीत. पण वडील राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू; तर आई कबड्डीमधील राष्ट्रीय खेळाडू आहेत. वडील आजही व्हॉलीबॉल खेळातील ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम बघतात. त्यामुळे माझ्या घरात कायम क्रीडाविषयक वातावरण आहे. घरात विविध खेळाडुंचे येणे-जाणे, चर्चा होत असल्याने साहजिकच मी ते बघत आलो. परिणामी, मला थोडेफार घरी येणाऱ्या क्रीडापटुंमुळे प्रेरणा मिळत गेली. आणि आई-वडीलांचे पाठबळ, मार्गदर्शन आणि मदत कायम झाली, असे शुभम वनमाळी सांगतो. फक्त माझी प्रेरणा घऊन बहीण सिध्दी वनमाळी देखील स्वीमर बनली असून ती राष्ट्रीय जलतरणपटू म्हणून नावाजली आहे. सध्या ती दिल्ली येथे शिक्षण घत आहे..
► नवी मुंबईत, गावी पोहण्यासाठी कसे सहकार्य होते?
- माझे मूळ गांव डहाणू येथील कासा आहे. जरी मी नवी मुंबईत राहण्यासाठी असलो तरीही ज्यावेळी गावी काशाला जातो, तेव्हा तेथील लोकांचे खूप सहकार्य होते. याठिकाणीही मला पोहण्याचा सराव करायला आवडते. डहाणू बीच अथवा तेथील धरणावर पोहण्यासाठी जातो. काहीवेळेला धरणाचे पाणी आटले असेल तर कॅनॉलमध्ये पाण्याच्या विरुध्द पोहण्याचा सराव करतो. इंग्लिश खाडी पोहून आल्यानंतर तर काशाच्या ग्रामस्थांनी मला अभिमानाने जवळ केले. तितकाच सन्मान मला नवी मुंबईत देखील मिळाला. नवी मुंबई महापालिकेने देखील माझा यथोचित गौरव केला आहे.
► शिक्षण कोठे घतले आणि पोहण्याचा मेळ कसा बसविला? जलतरणात येण्यामागील कारण?
- माझे शिक्षण रायन इंटरनॅशनल स्कुलमध्ये झाले असून नेरुळ मधील स्टर्लिंग कॉलेज येथून बी एम.एस. केले आहे. तर वाशीतील फादर ॲग्नेल स्कुलच्या जलतरण तलावात पोहण्याचे प्रशिक्षण घतले आहे. मला शाळेने देखील खूपच सहकार्य केले आहे. पोहण्याचा सराव सकाळच्या सत्रात असल्याने पहिल्या तासाला पोहोचता येत नव्हते. त्यामुळे शाळेने मला पहिल्या तासासाठी सवलत दिली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे लहानपणी मला अस्थमाचा त्रास होता. त्यावेळी उपाय म्हणून डॉक्टरांनी मला स्विमींग करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार चेंबूर येथील क्लबमध्ये पोहण्यास सुुरुवात केल्यानंतर काही कालावधीतच माझा अस्थमा बरा झाला. आधी स्विमींगकडे मस्ती म्हणून बघत होतो; पण स्वीमर म्हणून परिचय होऊ लागला आणि मी पाण्याशी एकरुप झालो.
►पहिली जलतरण स्पर्धा कोणती? त्याचा अनुभव काय सांगशील?
- माझी पहिली स्पर्धा अर्थात विलेपाले येथे आय.सी.एस.ई. तफे आयोजित करण्यात आलेली शालेय स्तरावरील होती. पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये उतरत असल्याने त्यावेळी पोटात गोळा आला होता. त्यावेळी डिसेंबरचा थंडीचा महिना होता. शिवाय जलतरण तलावातील पाणी देखील खूप थंड वाटत होते. तरीही निश्चय करुन या स्पर्धेत उतरलो. त्यावेळी लास्ट हिटमध्ये मी लास्ट आलो. पण, या स्पधेनंतर माझ्यात खूप धाडस आले. स्विमींग शिकल्यानंतर पहिल्या ५-६ वर्षानंतर इयत्ता ८वी-९वीत असताना नागोठणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत मला पहिले मेडल मिळाले. या स्पर्धेनंतर माझी झोनल स्पधेसाठी निवड झाली. आई-वडीलांमध्ये खूप संयम त्यामुळे त्यांनी कधीही माझ्याकडून मेडलची अपेक्षा केली नाही. फक्त आणि फक्त त्यांनी माझ्यात स्पोर्टस्ची आवड निर्माण केली. आवडते तेच करायला आई-वडीलांनी मला मुभा दिली.
► इंग्लिश खाडी पोहण्याचे प्रत्येक जलतरणपटुचे स्वप्न असते.. मग तु कसा निर्धार केलास?
- मी १५०० मीटर, जिल्हास्तरीय जलतरणपटू, ५००० मीटर, ६ कि.मी. अशा सागरी अंतराच्या स्पर्धा यशस्वी पार केल्या. त्यामुळे हळूहळू माझे जलतरणातील अंतर वाढत गेले. मी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहत गेलो. त्यातच वडीलांना जगभरातील नामांकित स्विमर्स बाबत माहिती असल्याने त्यांचा आदर्श घत मी इंग्लिश खाडी पोहण्याचे ठरविले. तशी माझ्या आई-वडीलांना देखील खात्री होती. त्यानुसार ४ ऑगस्ट २०१४ रोजी इंग्लिश खाडी मी १२ तास ४२ मिनिटात पार केली.
► इंग्लिश खाडी पोहताना आलेला बरा-वाईट अनुभव?
- इंग्लिश खाडी पोहण्यासाठी मला १२.४२ तास लागले. यातील १० तास मी शारीरिक शक्तीवर होतो, तर उर्वरीत मानसिक शक्तीवर होतो. इंग्लिश खाडी पोहताना शेवटच्या टप्प्यात खाडी संपता संपता पाण्याचा प्रवाह उलटा येतो. साहजिकच त्याने अंतर वाढते. यावेळी थंड पाण्यात शरीराचे तापमान वाढवावे लागते. इंग्लिश खाडी पोहताना १० तासात माझे डोळे वरती होत होते. त्रास जाणवत होता. पाठ व ओठ निळे पडले होते. डोक्यात थंडी निर्माण होण्याची लक्षणे जाणवत होती. मदतनीस, प्रशिक्षक आवाज देण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी ताेंडातून शब्ददेखील बाहेर पडत नव्हते. पण, मी मागचा-पुढचा विचार न करता धाडसाने इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा निर्धार प्रत्यक्षात उतरवून दाखवलाच.
► जिब्राल्टरची समुद्रधुनी पोहलास, तेथील अनुभव? मॅनहटन बाबत?
- जिब्राल्टरची समुद्रधुनी बाबत एक वेगळाच अनुभव आहे. ४ ऑगस्ट २०१४ रोजी इंग्लिश खाडी पोहल्यानंतर लगेचच २० ऑगस्ट रोजी जिब्राल्टर पोहण्यासाठी तारीख होती. पण तेथे वादळ येणार असल्याचे तेथील संयोजकांनी सांगितले. त्यामुळे आम्ही इंग्लंडमधून १० तासाचा प्रवास करुन स्पेनला पोहोचलो. तेथे पोहचल्या पोहचल्या मी न खाता-पिताच पाण्यात उतरलो आणि जिब्राल्टरची समुद्रधुनी पार केली. तेव्हा तो माझा आशियाई विक्रम ठरला. त्यामुळे माझी यंगेस्ट स्वीमर ऑफ द इयर म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नाेंद झाली. २०१४ मध्ये इंग्लिश खाडी आणि जिब्राल्टरची समुद्रधुनी पार केल्यानंतर २०१५ मध्ये न्युयॉर्क मधील ५० कि.मी. अंतराचे मॅनहटन आयलंड पार करायचे होते. तत्पूर्वी अमेरिकेतीलकॅटलिना खाडी पोहली होती. त्यावेळी आमच्या समोर आर्थिक अडचण उभी राहिली. मॅनहटनबाबत असोसिएशनकडून काहीच कन्फमेशन आले नव्हते. त्यावेळी भारतात परतून पुन्हा अमेरिका गाठणे जास्त खर्चिक असल्याने आम्ही तेथेच थांबण्याचा निर्णय घत जवळपास तेथे महिनाभर थांबलो होतो. आमचा बँक बॅलन्स झिरो झाला होता. त्यावेळी पप्पांचा मित्रपरिवार आणि कुटुंबियांनी मदत केल्यामुळे जास्त महागडे असणारे मॅनहटन पार करणे शक्य झाल्यामुळे त्या सर्व हितचिंतकांबद्दल माझ्या मनात कृतज्ञ भावना आहे.
► पाण्यात उतरताना पाण्यातील जलचरांबद्दल मनातील भिती आणि पोहण्यातील अनुभवाबद्दल थोडक्यात?
- मोठ्या समुद्रात, खाडीत पोहताना पाण्यात घातक जीव असतात, त्यांचा वेगळाच अनुभव आहे, तसाच चांगला अनुभव देखील आहे. २०१५ मध्ये कॅटलिना खाडी पोहण्यासाठी संयोजकांच्या सुचनेवरुन रात्री १० वाजता सुरुवात केली. या खाडीत शार्क, व्हेलसारखे घातक मासे, जेली फिश आदि आहेत. माझे स्विमींग सुरु झाल्यावर मार्ग दाखविणाऱ्या बोटीवरील सर्व लाईट बंद करण्यात आल्या. त्याने मासे विचलित होतात. संपूर्ण बोटीवर ब्ल्यू स्टीक होते. त्यामुळे मी बोटीला ट्रॅक करीत होतो. माझ्या डोळ्यांवर देखील ब्ल्यू स्टीक असल्याने आणि आकाशात चंद्राची छाया यामुळे पाणी आणि आकाशात सर्वत्र निळे वातावरण दिसत होते.
► मिळालेल्या पुरस्कार, शिक्षण याबाबत? इतर कोणते छंद?
- माझा महाराष्ट्रातील मानाच्या अशा शिवछत्रपती पुरस्काराने (२०१८-१९) महाराष्ट्र शासनाकडून गौरव करण्यात आला आहे. शिवछत्रपती पुरस्कार मला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते तर पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह इतर मंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नाेंद तसेच नवी मुंबई महापालिका, मुंबई महापालिका यांच्याकडून झालेला गौरव यासह इतर विविध संस्थांनी मला पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर माझे शिक्षण बी एम.एस. र्पयंंत झाले असून सद्यस्थितीत मी एक प्रॉडक्शन हाऊस चालवित आहे. पण, जर मला शासनाकडून चांगली संधी मिळाली तर ती मी नक्कीच स्वीकारेन. दुसरीकडे पोहण्याव्यतिरिक्त मी धावपटू म्हणून देखील सराव करीत आहे. मला मॅरेथॉनमध्ये धावायचे आहे. पण लॉकडाऊनमुळे जिम बंद झाल्याने फिटनेससाठी रनिंग चालू केली. आता रनिंगचे व्यसन जडले आहे.
► उदयोन्मुख खेळाडुंसाठी संदेश?
- आजच्या तरुणांनी सागरी जलतरण क्षेत्राकडे यावे. देशात आज सागरी जलतरणपटुंची संख्या, सागरी जलतरणावर प्रेम करणाऱ्या कम्युनिटीची संख्या वाढतेय. सागरी जलतरणाला प्रोत्साहन करण्यासाठी विदेशातील नामांकित जलतरणपटुंना येथे बोलावले. भारतात येऊन परदेशी जलतरणपटुंनी आमचे कल्चर पाहण्याची त्यांना विनंती केली आहे.
या मुलाखतीच्या समारोपात आपले नाव विश्वस्तरावर व्हावेसे वाटते अशी अपेक्षा शुभम वनमाळी याने शेवटी बोलून दाखवली. त्यामुळे शुभम वनमाळी याची ती मनोकामना लवकरच पूर्ण होवो, अशी ‘आपलं नवे शहर’ आणि तमाम नवी मुंबईकरांतफे शुभेच्छा!