श्री गोवर्धनी माता मंदिर येथे २६ सप्टेंबर २०२२ पासून नऊ दिवस नवरात्री उत्सव

श्री गोवर्धनी माता मंदिरात ‘नवरात्रोत्सव'चे आयोजन

नवी मुंबई ः सालाबादप्रमाणे बेलापूर किल्ले गांवठाण मधील श्री गोवर्धनी माता मंदिर येथे २६ सप्टेंबर २०२२ पासून नऊ दिवस नवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता गोवर्धनी मातेच्या शिल्प
प्रतिमेवर अभिषेक करण्यात येणार असून सकाळी ७ः३० वाजता देवीची घटस्थापना आणि आरती होणार आहे. यानंतर उत्सव काळात दररोज सकाळी आणि सायंकाळी ७ः३० वाजता मंदिरात देवीची आरती होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी गोवर्धनी माता मंदिरात नवचंडी होम करण्यात येणार असून यावेळी दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी श्री देवी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्त आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.

नवी मुंबईतील दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणून श्री गोवर्धनी मातेचे मंदिर अशी अख्यायिका आहे. श्री गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतील नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई म्हणून श्री गोवर्धनी माता प्रसिध्द आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली, भक्तांच्या हाकेला धावणारी आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी अशी श्री गोवर्धनी मातेची जनमानसात ख्याती आहे.

श्री गोवर्धनी माता मंदिर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून मंदिराच्या जवळच असलेल्या शिवकालीन किल्ल्याचा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेला आहे. अशा या पुरातन पेशवेकालीन मंदिराचा जीर्णोध्दार आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी १५ वर्षापूर्वी केला असून सुंदर भव्य असे मंदिर दक्षिणात्य पध्दतीने उभारले आहे. श्री गोवर्धनी माता म्हणजे साक्षात जणूकाय महालक्ष्मी, तुळजाभवानी, दुर्गामाता, एकविरा आईचे बालरुप आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जंगल सत्याग्रहाच्या ९२ व्या हुतात्मा स्मृती दिन हुतात्मा स्मृती स्तंभा समोर दरवर्षी उरण पोलीसांकडून हुतात्म्यांना मानवंदना