५३ हजार विद्यार्थ्यांकडून ‘स्वच्छ नवी मुंबई'चा जागर

नवी मुंबई ः इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत सीबीडी-बेलापूर, सेवटर-३ येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात नवी मुंबई इको क्नाईटस्‌ संघाचे कर्णधार पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासमवेत ४१ हजारहुन अधिक विद्यार्थी, युवकांनी विशेष कार्यक्रमात सहभागी होत स्वच्छतेचा एकमुखाने जागर केला. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रम वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथील सभागृहात लावलेल्या मोठ्या एलईडी स्क्रीनवरुन ऑनलाईन अनुभवणाऱ्या १२ हजार विद्यार्थी आणि युवकांनीही या ‘स्वच्छता जागर'मध्ये सहभाग घेतला.


केंद्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव' अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग'मध्ये ‘युथ वर्सेस गार्बेज' या टॅगलाईन नुसार भव्यतम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५३ हजारहुन अधिक युवकांनी स्वच्छ नवी मुंबईचा जागर केला.


याप्रसंगी नवी मुंबई इको क्नाईट्‌स संघाचे कर्णधार पद्मश्री शंकर महादेवन यांच्या समवेत आमदार गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार रमेश पाटील, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह सुप्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे, आदि मान्यवर उपस्थित होते.


 ‘निश्चय केला-नंबर पहिला' असे आपले ध्येय असून त्यासाठी नवी मुंबईतील युवकांची शक्ती एकत्र आलेली आहे, याचा आनंद व्यक्त करीत शंकर महादेवन यांच्या हस्ते नवीन स्वच्छता जिंगलचे अनावरण करण्यात आले. उपस्थित युवकांसमवेत सदर स्वच्छता जिंगल आणि आणखी काही लोकप्रिय गीते गाऊन शंकर महादेवन यांनी उपस्थित तरुणाईमध्ये चैतन्य निर्माण केले. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबईतील तरुणाई समोर स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी यायला मिळते आहे, याचा आनंद व्यक्त केला.


नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे स्वच्छतेमध्ये आपण नेहमीच आघाडीवर असतो आणि यापुढील काळातही राहू, अशी खात्री आ. गणेश नाईक यांनी व्यक्त केली. आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी स्वच्छतेबाबत जागरुकतेने उपस्थित असलेल्या विद्यार्थी, युवकांना शुभेच्छा देत नवी मुंबईचा नावलौकीक असाच उंचावत ठेवण्याचे आवाहन केले.
आ. रमेश पाटील यांनी आपल्या नवी मुंबई शहराने विविध सेवासुविधांमध्ये पुढाकार घेतला असून स्वच्छतेतही आपला पहिला नंबर असाच कायम राहील, असे विद्यार्थी-युवकांच्या उपस्थितीमधून दिसून येत असल्याचे सांगितले.


याप्रसंगी सादर झालेल्या आफरिन बँडच्या सुरेल सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फुर्त दाद दिली. विशेषत्वाने डिमॉलेशन क्रु या सुप्रसिध्द नृत्य समुहाचे चित्त थरारक नृत्याविष्कार पाहताना समोरील युवक भारावून गेले. स्टँडअप कॉमेडीयन मंदार भिडे यांनी आपल्या लहानपणीचे आणि शालेय महाविद्यालयीन जीवनातील किस्से सांगत मनोरंजनातून प्रबोधन केले.


दरम्यान, ४१ हजाराहून अधिक विद्यार्थी आणि युवक अत्यंत शिस्तबध्दरित्या राजीव गांधी क्रीडा संकुलात उपस्थित होते. पर्जन्यवृष्टी होऊनही कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ न देता विद्यार्थी-युवकांनी उत्साही सहभाग घेत स्वच्छतेचा जागर केला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्री गोवर्धनी माता मंदिर येथे २६ सप्टेंबर २०२२ पासून नऊ दिवस नवरात्री उत्सव