ठेकेदाराचे एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संगनमत
महापे एमआयडीसी मध्ये वृक्ष तोडीचे सत्र कायम?
वाशी ः महापे एमआयडीसी मध्ये रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामात अडथळा ठरत असलेल्या वृक्षांवर परवानगी पूर्वीच ठेकेदाराने कुऱ्हाड चालवली होती. याला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध करत सदर झाडे तोडण्यास आक्षेप घ्ोतला होता. परंतु, पर्यावरण प्रेमींच्या आक्षेपाला न जुमानता ठेकेदाराने एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमताने महापे एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे.
महापे एमआयडीसी मध्ये रस्ता काँक्रीटीकरणाच्या नावाखाली २८२९ झाडांची कत्तल करण्याचा डाव आखण्यात आला आहे. त्यास पर्यारणप्रेमींसह राजकीय पक्षांनी आक्षेप घ्ोतला होता. मात्र, त्याकडे एमआयडीसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यावर ‘पर्यावरण सेवा भावी संस्था'चे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण प्रेमींनी ‘एमआयडीसी'चे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्या दालनात ठिय्या देवून विना परवानगी वृक्ष तोड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.होती. तसेच सदर झाडे वाचावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी देखील आंदोलन केले होते. यावर वृक्ष तोड करण्याच्या कामाला स्थगिती देण्यात येईल, असे आश्वासन पर्यावरण प्रेमींना एमआयडीसी प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र,सदर आश्वासन पोकळ ठरले असून, संबधित ठेकेदाराने भर पावसात महापे एमआयडीसी मध्ये रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामात आड येणारी झाडे पुन्हा एकदा विनापरवानगी तोडण्याचे सत्र सुरु ठेवले आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासन कायद्याला जुमानत नाही का?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याबाबत ‘एमआयडीसी'चे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद लाभला नाही.
महापे एमआयडीसी मध्ये परवानगी पूर्वीच वृक्षतोड केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी पर्यावरण सेवा भावी संस्था तर्फे करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील महापे एमआयडीसी मध्ये वृक्ष तोडीचे सत्र सुरुच असल्याने सदर ठेकेदारास एमआयडीसी अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासन विरोधात पर्यावरण सेवा भावी संस्था तीव्र आंदोलन छेडणार आहे.- बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष - पर्यावरण सेवा भावी संस्था, नवी मुंबई.