बेलापूर गाव हे माझे घर आहे आणि यासाठी मी नेहमी काम करायला तयार - आ. मंदाताई म्हात्रे
नवी मुंबई : बेलापूर गाव येथील श्रीराम मंदिरासमोर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या रु. 15 लाख आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या सभा मंडपाचे भूमिपूजन नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले. यावेळी माजी नगरसेवक दि.ना.पाटील, अमित पाटील, नारायण मुकादम, मंदीराचे अध्यक्ष घोसाळकर, न.मुं.म.पा. अभियंता अरविंद शिंदे, बाळकृष्ण बंदरे, महादेव पाटील, ज्योती पाटील, रविंद्र म्हात्रे, शैला म्हात्रे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
बेलापूर गावातील शिव मंदिरात होणारी गळती, त्याची डागडुजी व नव्याने समाजमंदिर उभारणे तसेच बेलापूर गावातील मार्केटचा प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
बेलापूर गाव ही माझी कर्मभूमी आहे. या गावाची सून म्हणून या ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे हे माझे कर्तव्य आहे. शक्य होईल तेवढे मी या गावासाठी करू इच्छिते. गावातील राम मंदिर, शंकर मंदिर, हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर येथे आम्ही शेड बनवायचे काम करत आहोत. गावातील शंकर मंदिरात पाणी गळती होत असल्याने समाजमंदिर बांधून देण्याची ग्रामस्थांनी केलेली मागणी मी मान्य केलेली आहे तसेच गावकऱ्यांसाठी गणेश विसर्जन घाट व दशक्रिया विधी घाट असे उभारण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतच्या काळापासून ग्रामस्थांची दुकाने ही महापालिकेने निष्कासित केली होती. ती नव्याने लवकरात लवकर बनवून देण्यात यावी यासाठी मी आमदार निधीतून 25 लाखाचा फंड दिला आहे. गावात ज्या काही सोयी-सुविधा हव्या आहेत त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मिळून एक बैठक घेऊन सोडवूया. बेलापूर गाव हे माझे घर आहे आणि यासाठी मी नेहमी काम करायला तयार असल्याचे यावेळी आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.