मुसळधार पावसाने ‘नवी मुंबई'ला झोडपले
मुसळधार पावसाने नवी मुंबई, ठाणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांना चांगलेच झोडपले
नवी मुंबई ः गेल्या आठवडाभरापासून सातत्याने आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबई, ठाणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांना चांगलेच झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे नवी मुंबई शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. नवी मुंबईतील सानपाडा गांव, शिरवणे गांव, कोपरखैरणे रेल्वे स्थानक, घणसोली, ऐरोली आदि ठिकाणच्या भुुयारी मार्गासह सखल भागात पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक ठप्प तर काही ठिकाणी वाहनांचा वेग मंदावला होता.
पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेववर देखील परिणाम झाला. सीएसएमटी ते पनवेल मार्गावरील लोकल उशिराने धावत होत्या. रस्त्यांवर देखील पाणी साचल्याने वाहतूक काेंडी देखील झालेली पहावयास मिळाली. सायन-पनवेल महामार्गावर देखील पावसामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकंदरीतच पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले.
नवी मुंबई शहरात १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० ते जुलै ते १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० या २४ तासामध्ये सरासरी ५७.४६ मि.मी. पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पाऊस नेरुळ विभागात (६७.१० मि.मी) झाला. त्याखालोखाल बेलापूर विभाग (६५.२० मि.मी.), वाशी (५०.२० मि.मी.), कोपरखैरणे (५४.१० मि.मी.), ऐरोली (५३.४० मि.मी.) आणि दिघा (५४.८० मि.मी.) असा पाऊस झाला. तर १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत सरासरी ४०.०३ मि.मी. पाऊस बरसला. यामध्ये बेलापूर (३६ मि.मी.), नेरुळ (३२ मि.मी.), वाशी (२९.७० मि.मी.), कोपरखैरणे (६३ मि.मी.), ऐरोली (४०.९० मि.मी.) आणि दिघा (३८.६० मि.मी.) असा पाऊस झाला. नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये यावर्षी एवूÀण २७१२.०७ मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे महापालिका आपत्ती निवारण कक्षातून सांगण्यात आले.
शहरातील एपीएमसी, औद्योगिक परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झालीे. सायन-पनवेल महामार्गावर जागोजागी पाणी साचल्याने वाहनांना द्राविडी प्राणायाम करत मुंगीच्या गतीने पुढे जावे लागत होते. एपीएमसी आवारात भाजी मार्केट, दाणा बाजार परिसरात पाणी साचल्याने व्यापाऱ्यांना याचा फटका बसला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहून येत असल्याने महापे, पावणे, तुर्भे एमआयडीसी परिसरात काही ठिकाणी तलावाचे रुप आले होते.
नवी मुंबईसह जवळच्या खारघर, पनवेल आणि उरण भागात देखील जोरदार पाऊस बरसला आहे. याठिकाणी देखील सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक काेंडीसह वाहतूक मंदावली गेली.दुसरीकडे नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण गेल्या वर्षी दमदार पावसामुळे २९ सप्टेंबर २०२१ ला पूर्ण भरले होते. परंतु, मुसळधार पाऊस कोसळून देखील अद्याप मोरबे धरण ओव्हरफ्लो झालेले नाही. गेल्या २४ तासात मोरबे धरण परिसरात ६१.४० मि.मी. इतका पाऊस बरसला आहे. तिथे फक्त ४५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरण परिसरात आजवर ३०८८.६० मि.मी. पाऊस पडला आहे. दरम्यान, मोरबे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते. आजमितीस धरणात अद्याप ८६.२८ मि.मी. इतकी पाणी पातळी झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस असाच बरसला तर मोरबे धरण ओव्हरफ्लो होणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.