५० खोके-एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध
नवी मुंबई ः वेदांत-फॉवसकॉन कंपनीचा १.४५ लाख कोटींचा आणि महाराष्ट्र राज्यातील १ लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प राज्यातील शिंदे सरकारच्या उदासिनतेमुळे केंद्र सरकारने गुजरातला नेल्याचा आरोप करुन नवी मुंबई मधील शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विरोधात रणशिंग फुंकले. यावेळी शिवसैनिकांनी १५ सप्टेंबर रोजी ठाणे-बेलापूर रोडवरील तुर्भे उड्डाणपुलाजवळ आंदोलन केले.
राज्यातील शिंदे सरकारच्या उदासिनतेमुळे १.४५ लाख कोटींचा वेदांता प्रकल्प केद्र सरकारने महाराष्ट्रातून गुजरातला नेला आहे. त्यामुळे शिंदे सरकारने महाराष्ट्राचे नुकसान केल्याचा सर्वत्र आरोप होत आहे. अशा या गुजरात हितासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा शिवसैनिकांनी निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ५० खोके-एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
सदर आंदोलनाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, प्रकाश पाटील, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख सोमनाथ वास्कर, समीर बागवान, महेश कोठीवाले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.