नवी मुंबईच्या नावलौकीकात अभियांत्रिकी विभागाचे महत्वाचे योगदान -बांगर

 नवी मुंबई ः नवी मुंबईच्या नावलौकीकात अभियांत्रिकी विभागाचे महत्वाचे योगदान आहे.याचा अभिमान बाळगतानाच  नवनिर्मिती, सर्जनशीलता असा इंजिनिअरींग शब्दाचा खरा अर्थ असून आपण काम करताना या दृष्टीने करतो काय याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई महापालिका अभियांत्रिकी विभागाच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित अभियंता दिन समारंभात आयुक्त अभिजीत बांगर आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, समारंभाचे प्रमुख वक्ते राजेंद्र कुमार सराफ, माजी शहर अभियंता सुरेंद्र पाटील, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड, आदि व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, भारतरत्न सर विश्वेश्वरय्या  यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून प्रत्येक अभियंत्याने वेगळेपण जपणारे काम करावे, अशी अपेक्षा आयुवत बांगर यांनी यावेळी व्यक्त केली.

कामातील एखादी त्रुटी दर्शविण्यात आली तर त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्यात अभियांत्रिकी विभाग आघाडीवर असतो, हीच इतर विभागांनी अनुकरण करण्याची गोष्ट आहे. दैनंदिन काम करताना आपण करीत असलेल्या कामाबद्दल आत्मसंतुष्टता सर्वात मोठा धोका असून त्यापासून दूर राहिले पाहिजे. अभियंत्यांनी सतत अद्ययावत माहितीचा अभ्यास करुन त्याबद्दलचे वाचन वाढवून त्या ज्ञानाचा काम करताना वापर केला पाहिजे, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.

शहर अभियंता संजय देसाई यांनी आपल्या मनोगतात महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने केलेल्या कामांचा आढावा घेत आगामी नियोजित प्रकल्प आणि सुविधा कामे या विषयी विस्तृत माहिती दिली. कोव्हीड काळातील आपल्या कामाची दखल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून तक्रार निवारणाच्या जलद कार्यवाहीची दखल आस्कीसारख्या मानांकित संस्थेकडून घेतली गेली आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. स्थापत्य, पाणीपुरवठा, मलनिःस्सारण, पर्यावरण, यांत्रिकी, विद्युत, संगणक अशा विविध अभियांत्रिकी क्षेत्रात यापुढील काळात नागरिकांना समाधानकारक अशा दर्जेदार सुविधा पुरविण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून काम केले जात आहे. महापालिका आयुक्तांना अभिप्रेत असलेली दैनंदिन कामांमध्ये आधुनिकता आणि नाविन्यता आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास संजय देसाई यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ अभियंता राजेंद्र कुमार सराफ यांचे स्मार्ट इंजिनिअरिंग ऑफ बेटर वर्ल्ड या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपअभियंता विवेक मुळे यांनी भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. तसेच उपअभियंता विश्वकांत लोकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

0 ते ५ वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण