विकास आराखड्यात प्रस्तावित रस्त्यांमध्ये अनेक घरे बाधीत
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका द्वारे १० ऑगस्ट २०२२ रोजी नवी मुंबई शहराचा प्रारुप विकास आराखडा प्रसिध्द करण्यात आला आहे. या आराखड्यात नवी मुंबई शहरातील अनेक गावठाणात रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. परंतु, या रस्त्यांमध्ये अनेक घरे बाधीत होणार असल्याने ग्रामस्थांच्या मनात धडकी भरली आहे.
मुंबई शहरातील वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी १९७० मध्ये सिडको मार्फत नवी मुंबई शहराची निर्मिती करण्याची संकल्पना राज्य शासनाने पुढे आणली. त्यानंतर १९७२ साली ‘सिडको'ने ठाणे-बेलापूर पट्टीतील जमिनी संपादित करुन नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यास सुरुवात केली. मात्र, नवी मुंबई शहराचा विकास करताना ‘सिडको'ने येथील गावांचा विकास केला नाही. त्यामुळे नवी मुंबई मधील गावे विकासापासून वंचित राहिली. त्यानंतर १९९२ मध्ये नवी मुंबई महापालिका स्थापन झाली. मात्र, महापालिकेचा स्वतःचा विकास आराखडा नसल्याने नवी मुंबई मधील गावांचा विकास आणखीनच खुंटला.
१९९२ मध्ये नवी मुंबई महापालिका स्थापन झाली. मात्र, स्थापना होऊन २५ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही ‘सिडको'च्या विकास आराखड्यानुसारच महापालिका काम करीत होती. अखेर २५ वर्षानंतर महापालिकेने २०१७ साली स्वतःचा विकास आराखडा तयार केला. महापालिका महासभेत नवी मुंबई शहराचा विकास आराखडा सादर केल्यावर राज्य शासनाच्या मंजुरीनंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी म्हणजे तब्बल पाच वर्षानंतर महापालिकेने प्रारुप आराखडा प्रसिध्द केला आहे. मात्र, या विकास आराखड्यात मुळ गावठाणांवरच घाला घालण्यात आला आहे. विकास आराखड्यात नवी मुंबई शहरातील अनेक गावठाणांमध्ये महापालिकाने रस्ते प्रस्तावित केले आहेत. परंतु, सदर रस्त्यात गावठाणांतील अनेक घरे बाधीत होणार असल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. त्यामुळे सदर विकास आराखड्यावर जास्तीत जास्त नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मदन मुकादम यांनी केले आहे.
नवी मुंबई शहर वसवताना ‘सिडको'ने येथील गावठाणांचा विकास करणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे ‘सिडको'ने दुर्लक्ष केले.आणि ‘सिडको'चाच कित्ता नवी मुंबई महापालिकेने गिरवला. आज नवी मुंबई शहरातील गावठाणांमध्ये सामाजिक सुविधांची वानवा असून, नवी मुंबई मध्ये उरलेल्या गावांवर देखील विकास आराखड्याच्या आडून बुलडोझर फिरवण्याचे काम आता महापालिकेने हाती घेतले आहे काय?. - विजय घाटे, शहर अभ्यासक - नवी मुंबई.
नवी मुंबई शहराचा सध्या प्रारुप विकास आराखडा नवी मुंबई महापालिकेने सादर केला आहे. त्यावर ६० दिवसांच्या कालावधीत नागरिकांच्या हरकती, सूचना मागवल्या आहेत. आराखड्यावर हरकती, सूचना आल्यानंतर एक नियोजन समिती नेमली जाणार आहे. या समिती मार्फत पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. - सोमनाथ केकान, नगर रचनाकार - नवी मुंबई महापालिका.