गणेशोत्सवात ३८.७९५ टन निर्माल्य जमा

नवी मुंबई ः 31 ऑगस्ट पासून अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या श्री गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणशील दृष्टिकोन जपत १५ हजारपेक्षा अधिक श्रीमूर्तींचे १३४ कृत्रिम तलावात विसर्जन केले. त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले आणि सुके अशा वेगवेगळ्या निर्माल्य कलशातच टाकावे या महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलेल्या आवाहनालाही उत्तम प्रतिसाद दिला.


श्री गणेशोत्सवातील पाच विसर्जन दिवसांमध्ये २२ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशात  ३८.७९५ टन ओले निर्माल्य जमा झाले. सदर निर्माल्य संकलित करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वतंत्र ४६ निर्माल्य वाहतुक वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.


गणेशोत्सवात श्रीमुर्तींसोबत विसर्जनस्थळी येणाऱ्या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुर्नप्रक्रिया करण्यायोगे ‘ओले निर्माल्य' तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे ‘सुके निर्माल्य' ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती.


अशाप्रकारे ओले आणि सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्री गणेशोत्सव विसर्जन कालावधीत दीड दिवसाच्या विसर्जनावेळी ६.०७० टन, पाच दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी ५.६९५ टन, गौरींसह सहाव्या दिवशी १२.५७० टन, सातव्या दिवशी ४.५७५ टन तसेच अनंत चतुर्दशी दिनी ९.८८५ टन अशाप्रकारे पाच विसर्जन दिनी एकूण ३८.७९५ टन निर्माल्य जमा झाले. या निर्माल्याच्या वाहतुकीसाठी ४० स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सदर निर्माल्य तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे.


अशाच प्रकारे अंकुर सामाजिक संस्था यांच्या वतीने चिंचोली तलाव, शिरवणे आणि करावे तलाव येथे तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने धारण तलाव, कोपरखैरणे येथे विसर्जन स्थळांवर निर्माल्यापासून खतनिर्मिती कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे श्रीमुर्तींसोबत आणली गेलेली प्रसादरुपी फळे आणि खाद्यपदार्थ विसर्जन स्थळी जमा करुन त्यांचे निराधार आणि गरजू नागरिकांना वितरण करण्यात आले.


पर्यावरणशील दृष्टीकोन जपण्यात आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात नवी मुंबईकर नागरिक नेहमीच पुढाकार घ्ोताना दिसत आहेत. यामुळे नवी मुंबईच्या पर्यावरणशील शहर नावलौकिकात सातत्याने वाढ होत आहे. -अभिजीत बांगर, आयुक्त -नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भूमीगत कचरापेंटींना पाणी साचण्याच्या समस्येने ग्रासले