महिलांकडून १०० किलो श्री मूर्तीचे विसर्जन
‘नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ'च्या वतीने नवीन आदर्शपुर्वक गणेशाचे विसर्जन
वाशी : महाराष्ट्र राज्यात गोविंदा पथक असो की ढोल ताशे पथक असो यामध्ये महिलाही अगदी हिरहिरीने सहभाग घेत असतात. मात्र, आता श्री मूर्ती विसर्जन देखील महिला करु शकतात, याचे उदाहरण सानपाडामध्ये दिसून आले आहे. शाडूच्या मातीपासून साकारण्यात आलेल्या पामबीच-सानपाडा येथील ‘नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ'च्या १०० किलो वजनी ‘सोनखारचा राजा'या मूर्तीचे विसर्जन यंदा महिलांनी पुढाकार घेत केल्याने महिलाही कुठे कमी नाहीत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखली ‘नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ'च्या वतीने मागील २६ वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या दरम्यान विविध सामजिक उपक्रम राबविले जातात. या सर्व उपक्रमांमध्ये येथील महिला पुरुष वर्गाच्या खांद्याला खांदा लावत सहभाग घेत असतात. अगदी श्री मूर्ती प्रतिष्ठापना पासून ते विसर्जन पर्यंत. आजवर आपल्याकडे श्री मूर्तींचे विसर्जन पुरुष वर्गांमार्फतच केले जायचे. मात्र, या परंपरेला ‘नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ'ने यंदा छेद देत एक नवीन आदर्श घालून दिला आहे. मंडळाने यंदा पर्यावरण पूरक अशी मूर्ती प्रतिष्ठापीत केली होती. या मूर्तीचे विसर्जन कुत्रिम तलावात आणि तेही चक्क महिलांनी केले. यासाठी माजी नगरसेविका सौ. वैजयंती भगत यांनी पुढाकार घेत महिला वर्गाला प्रोत्साहित केले. त्यानुसार येथील महिलांनी १०० किलो वजनाच्या शाडूच्या मातीपासून साकारलेल्या मूर्तीचे विसर्जन केले.