१८६३ गौरींसह ११०१८ गणेशमुर्तींचे महापालिका क्षेत्रात भावपूर्ण विसर्जन

नवी मुंबई ः गौरी-गणपतीचा सण संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. श्रीगणेशोत्सवात गौरींसह विसर्जित होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील श्रीगणेशमूर्तींची संख्या लक्षात घ्ोऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ नैसर्गिक आणि १३४ कृत्रिम अशा १५६ विसर्जन स्थळांवर भाविकांच्या अलोट उत्साहामध्ये १८६३ गौरींसह ११०१८ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले.

नैसर्गिक जलसंपदा जपणूकीच्या दृष्टीने नागरिकांनी सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात महापालिकेने तयार केलेल्या १३४ कृत्रिम विसर्जन तलावात श्रीमूर्तींचे विसर्जन करावे, या महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलेल्या आवाहनाला पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या १३४ कृत्रिम विसर्जन तलावात ४९१४ घरगुती, २१ सार्वजनिक मिळून ४९९५ गणेशमूर्तींचे आणि ७६५ गौरींचे विसर्जन करण्यात आले.

महापालिका क्षेत्रातील २२ नैसर्गिक आणि १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर श्रीगणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी १०९०८घरगुती, ११० सार्वजनिक मिळून एकूण ११०१८ श्रीगणेश मूर्तींना आणि १८६३ गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा विभागातील नागरिकांनी पर्यावरणशील दृष्टीकोन जपत नैसर्गिक तलावांच्या तुलनेत कृत्रिम तलावांतील विसर्जनाला अधिक पसंती दिली. या विभागामध्ये नैसर्गिक तलावांपेक्षा साधारणतः दुपटीने आणि काही विभागांत तर दुपटीपेक्षा अधिक श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्यात आले.

गौरींसह विसर्जित होणाऱ्या श्रीगणेशमुर्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर असते याचे भान ठेवून महापालिका उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि महापालिका उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगीरे यांच्यासह आठही विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळांवर आवश्यक अशी सर्व व्यवस्था पुरविण्याकडे काटेकोर लक्ष देण्यात आले होते. त्यामुळे विसर्जनस्थळी आलेल्या गौरी-गणपतींचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात सुव्यवस्थित रितीने विसर्जन संपन्न झाले. सर्व आठही विभागातील अधिकारीकर्मचारी यांच्यासह अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफ गार्डस्‌ यांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडली. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुजाता ढोले यांनीही अनेक विसर्जन स्थळांना भेटी देऊन पाहणी केली.

श्रीमूर्ती विसर्जनाकरीता सर्व ठिकाणी तरापयांची तसेच मोठ्या मूर्ती असतात अशा आवश्यक ठिकाणी फोर्कलिपटची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनस्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबुचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. तसेच विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याठिकाणी पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती. भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती आणि पूजा करण्यासाठी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली होती.

विसर्जन स्थळांपैकी ‘तलाव व्हिजन' अंतर्गत सुशोभित करण्यात आलेल्या १४ मुख्य तलावांमध्ये गॅबियन वॉल निर्धारित क्षेत्रातच भाविकांनी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गौरी आणि श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करुन पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महापालिकेच्या आवाहनास उत्तम सहकार्य दिले. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जनस्थळांवर सूचना आणि स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही भाविकांना आवश्यक सूचना देणे, गर्दीचे नियोजन करणे शक्य झाले. तसेच विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यात मोलाची मदत झाली. सर्वच ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका अग्निशमन दलासह पोलीस यंत्रणाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज होती.

विसर्जनस्थळांवर नागरिकांमार्फत श्रीमुर्तींसोबत आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुर्नप्रक्रिया करण्यायोगे ‘ओले निर्माल्य' यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लास्टिक आदी ‘सुके निर्माल्य' स्वतंत्र कलशात टाकावे, कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत, या महापालिका मार्फत करण्यात आलेल्या आवाहनाला भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून, निर्माल्य महापालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे. या निर्माल्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. याशिवाय श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे, खाद्य वस्तू भाविक स्वतंत्र कॅरेटमध्ये ठेवत असून, त्यांचे नंतर गरजू मुले आणि नागरिकांना वितरण करण्यात येत आहे.

श्रीगणेशमुर्ती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी सर्वच १५६ विसर्जन स्थळांवर नवी मुंबई महापालिका द्वारे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, दहाव्या दिवशीच्या विसर्जन सोहळ्यासाठी नागरिकांनी महापालिस सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोपरखैरणेतील दुतर्फा वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर