गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात चोख बंदोबस्त

नवी मुंबई : कोरोनामुळे मागील दोन वर्षे साध्या पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव यावर्षी मोठया उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे भक्तांना हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे व आनंदाने साजरा करता यावा तसेच गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेश भक्तांनी देखील गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन शांततेत गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.    

मागील दोन वर्षे गणेशोत्सव काळात कोरोनाचे सावट होते, त्यामुळे बहुतेक सार्वजनिक मंडळांनी आपले गणेशोत्सव रद्द केले होते. मात्र यंदा कोरोनाचे सावट नसल्याने गणेश भक्तांकडून धुमधडाक्यात व मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे व आनंदाने साजरा करता यावा, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी देखील जय्यत तयारी करुन गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावर्षी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे 800 सार्वजनिक व 82000 खाजगी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.  

त्यामुळे गणशोत्सव सुरळीत व शांततेत पार पडावा यासाठी पोलीस ठाणे स्तरावर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांच्या एकुण 51 बैठका तर डॉल्बी मालकांच्या 9 बैठका घेऊन त्यांना प्रामुख्याने ध्वनीप्रदुषण रोखणे तसेच उत्सव शांततेत साजरा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणशोत्सव मंडळांना विविध विभागाच्या परवानग्या एक खिडकी योजनेअंतर्गत घेता यावेत यासाठी विविध पोलीस ठाण्यांकडुन 300 पेक्षा अधिक मंडळांना परवानग्या देण्यात आल्याची माहिती विशेष शाखेच्या पोलीस उपआय्क्तु रुपाली अंबुरे यांनी दिली.  

समाजकंटकावर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे 

गणेशोत्सव काळात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता अधिनियमाप्रमाणे 206 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. समाजकंटकावर व समाजविघातक व्यक्तीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 150 गणेशमुर्ती विसर्जन घाटापैकी महत्वाच्या विसर्जन घाटावर पोलीस आयुक्तालयाकडुन सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. उर्वरीत विसर्जन घाटावर स्थानिक पोलीस ठाणे व महापालिकेच्या वतीने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.  

पोलीस बंदोबस्त  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण 806 सार्वजनिक व 81710 खाजगी गणेशमुर्तींचे विसर्जन होणार असून सदरचे विसर्जन शांततेत पार पाडावा यासाठी 6 पोलीस उपआयुक्त, 10 सहाय्यक पोलीस आयुक्त, 67 पोलीस निरीक्षक, 274 सहाय्यक  पोलीस निरीक्षक-सहाय्यक पोलीस निरीक्षक, तसेच 3150 पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय स्ट्रायकिंग फोर्स-8 (120 पोलीस कर्मचारी), क्युआरटी -1,आरसीपी-1,एसआरपीएफ 2 फ्लाटुन तसेच 300 होमगार्ड तैनात ठेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळे, विसर्जन स्थळे, मिरवणुकीचे मार्ग यावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये यासाठी नवी मुंबई पोलीसांचे प्रशिक्षीत बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात ठेवण्यात येणार आहे. 

ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी ध्वनीप्रदुषण विरोधी पथक  

उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदुषण नियंत्रण नियम 2000 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 संदर्भात दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात ध्वनीप्रदुषण विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ध्वनीमापक यंत्रे हाताळण्याबाबतचे प्रात्याक्षिक प्रशिक्षण देण्यात आले असून यासंर्भात कारवाई करण्याच्या पद्धती (एसओपी) याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे सार्वजनीक गणेशोत्सव 2022 मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्कृष्ट गणेश मुर्ती, उत्कृष्ट पध्दतीने राबविलेले सामाजिक उपक्रम, शिस्तबध्द मिरवणुक, उत्कृष्ट देखावा, सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना बक्षिस देण्यात येणार असून त्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.   

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणेशोत्सव मध्ये महापालिकेची लसीकरण केंद्रे सुरु