घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळाचे लवकरच अद्ययावतीकरण

नवी मुंबई ः ओला, सुका आणि घरगुती घातक अशा तीन प्रकारच्या कचरा वर्गीकरणावर भर दिला जात असतानाच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी त्यावर होणाऱ्या प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. यावेळी आयुवतांनी प्रकल्पस्थळी येणाऱ्या सुक्या कचऱ्यातील घटक वेगवेगळे करण्याची सध्याची पध्दत अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. तसेच ओला कचरा, सुका कचरा आणि घरगुती घातक कचरा यांच्या प्रक्रियेच्या जागा अधिक स्वच्छ राखण्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी आयुक्त बांगर यांच्या समवेत घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता  शिरीष आरदवाड आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पस्थळी येणाऱ्या सुक्या कचऱ्यांच्या गाड्यांची पाहणी करत कचरा प्रकल्पस्थळी आल्यानंतर त्याची वेगवेगळ्या पातळीवर होणाऱ्या प्रक्रियेची आयुक्त बांगर यांनी सविस्तर बारकाईने पाहणी केली. सुक्या कचऱ्यातील धातू, काच, कपडे, गोणी, काचेच्या बाटल्या, प्लास्टीक बाटल्या, इतर प्लास्टीक अशा विविध प्रकारचे घटक वेगळे करण्याची सध्याची पध्दत अधिक व्यापक स्वरुपात राबविण्याचे निर्देश देत तेथील यंत्रणेची व्याप्ती वाढविण्यासाठी तत्पर कार्यवाही करण्याचे त्यांनी सूचित केले. यासाठी आवश्यक क्षमतेच्या मोटार बसविणे, यंत्रामध्ये कचरा पुढे सरकतो त्या पट्ट्याची लांबी वाढविणे, पट्ट्यावरुन सरकणारा सुका कचरा वस्तुनुरुप वेगळा करण्यासाठी मनुष्यबळ वाढ अशी आवश्यक कार्यवाही गतीमानतेने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रकल्पस्थळी ओल्या कचऱ्यावर २८ दिवसांनी खत निर्मिती प्रक्रिया केली जाते. तोपर्यंत त्यावर आवश्यक रसायनांची फवारणी करुन तो दर दोन दिवसांनी खाली-वर फिरविला जाऊन खत निर्मितीसाठी तयार केला जातो. सदर प्रक्रिया अधिक सुनियोजित पध्दतीने होण्याच्या दृष्टीने प्रत्येक आठवड्याच्या संकलीत कचऱ्याच्या ठिकाणी तशाप्रकारचे सुस्पष्ट फलक लावावे. तेथील बांधकाम आणि पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळाची पाहणी करताना आयुक्तांनी त्यामधून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या जाडीच्या खडीची पाहणी केली. तसेच पेव्हर ब्लॉक आणि विटा बनविण्याच्या यंत्रणेचीही पाहणी केली. यामधून निर्माण होणारे बांधकाम साहित्य महापालिकेच्या कामांमध्ये वापरण्याच्या सूचना देतानाच सदर प्रकल्प नियमित सुरु राहिल याची दक्षता घ्यावी. एकंदरीतच ओल्या आणि सुक्या कचऱ्याप्रमाणेच घरगुती घातक कचऱ्याचीही शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी, असे आयुक्तांनी सूचित केले.

आपल्या घरी दररोज निर्माण होणारा कचरा ओला, सुका आणि घरगुती घातक अशा तीन प्रकारे घरातच वर्गीकरण केला तर प्रकल्पस्थळी कचरा वेगवेगळा जाईल. त्यामुळे आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या स्वच्छताकर्मींचे काम वाढणार नाही. यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने माझा कचरा माझी जबाबदारी असे आपले कर्तव्य लक्षात घेऊन घरातूनच कचऱ्याचे वर्गीकरण करुन  आपल्या स्वच्छताकर्मींवर कचरा वेगळा करण्याची अतिरिक्त जबाबदारी पडू न देण्याची दक्षता घ्यावी.
-अभिजीत बांगर, आयुक्त  - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीतील विकासकांना आणि वाहतूक विभागाला विद्यार्थ्याचे  बळी हवे आहेत का?