नियमबाह्यरित्या महाराष्ट्र शासन नावाच्या पाट्या
नवी मुंबई ः वाहनांवर महाराष्ट्र शासन अशा पाट्या लावून शासकीय अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या २१ वाहनांवर ‘नवी मुंबई आरटीओे'ने कारवाई केली आहे. ‘आरटीओ'च्या पथकाने या सर्व वाहन चालकांवर १७७ नुसार कारवाई करुन त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच त्यांच्या वाहनात असलेल्या महाराष्ट्र शासन नावाच्या पाट्या जप्त केल्या आहेत. ‘आरटीओ'कडून करण्यात आलेल्या या कारवाईत बहुतेक वाहन चालकांनी टोल चुकविण्यासाठी आपल्या वाहनावर महाराष्ट्र शासन नावाच्या पाट्या लावल्याचे आढळून आले आहे.
गोंदिया येथील ‘विश्वासू प्रवासी संघटना'चे सदस्य नरेशकुमार जैन यांनी राज्यातील जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त येत असलेल्या विभिन्न विभागातील वाहनांवर, प्रवासी परवाना, राष्ट्रीय परवाना आणि खाजगी वाहनांवर तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खात्यातील वाहनांवर नियमबाह्यरित्या महाराष्ट्र शासन लिहून आपली वाहने चालविण्यात येत असल्याची बाब राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच अनेक खासगी आणि टुरिस्ट वाहन चालक सुध्दा आपल्या वाहनांवर नियमबाह्यरित्या महाराष्ट्र शासन अशा पाट्या लावून सर्रास फिरत असल्याचे देखील जैन यांनी निदर्शनास आणून दिले होते. तसेच अशा वाहनांवर कारवाई करण्याबाबत तक्रार केली होती.
सदर तक्रारीची राज्य परिवहन विभागाकडून दखल घेण्यात आली असून वाहनांवर नियमबाह्यरित्या महाराष्ट्र शासन लिहून वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाचे उपायुक्त अभय देशपांडे यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उप-प्रादेशिक परिवहन अधिकारीयांना दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गत दोन दिवसांपासून वाशी टोल नाका येथे महाराष्ट्र शासन नावाच्या पाट्या लावून फिरणाऱ्या वाहनांची झाडाझडती सुरु केली आहे. या झाडाझडतीत २१ वाहन चालक नियमबाह्यरित्या महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावून जाताना सापडले. यातील बहुतेक वाहन चालक टोल चुकविण्यासाठी आपल्या वाहनांवर महाराष्ट्र शासन नावाच्या पाट्या लावत असल्याचे आढळून आले आहे.
या कारवाईत सापडलेल्या २१ वाहन चालकांवर ‘आरटीओ'कडून १७७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात येऊन त्यांच्या वाहनात असलेल्या महाराष्ट्र शासन नावाच्या पाट्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाईत सापडलेल्या बहुतेक वाहन चालकांनी टोल चुकविण्यासाठी आपल्या वाहनांवर महाराष्ट्र शासन नावाच्या पाट्या लावल्याचे आढळून आले आहे. यापुढे देखील अशा वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. - गजानन गावंडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई.