गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर जड-अवजड वाहनांना बंदी
नवी मुंबई ः ‘'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ'द्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासियांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. परंतु, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६६ वरुन जड वाहने आणि रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोटार वाहन अधिनियमामधील तरतुदीचा वापर करुन सार्वजनिक हितास्तव पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ (रा.म.क्र.जुना क्र.१७) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) येथून होणाऱ्या वाळू-रेतीच्या ट्रकची तसेच जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत शासनाकडून विविध सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास, मूर्तीचे आगमन होत असल्याने २७ ऑगस्ट रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना (जड, अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर) वाहतुकीसाठी पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
५ आणि ७ दिवसीय गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन तसेच काही अंशी गणेशभवतांच्या परतीच्या प्रवासाकरिता ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे, अशा सर्व वाहनांची वाहतूक देखीलपूर्णतः बंद करण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी १० दिवसीय गणपती विसर्जन, परतीचा प्रवास असल्याने ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा जड-अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी राहणार आहे.
एकंदरीतच २७ ऑगस्ट रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर वाळू, रेती आणि तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णतः बंद घालण्यात आली आहे. परंतु, सदरचे निर्बंध दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला आणि नाशवंत माल आदि जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६च्या रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल आदि ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही.
या संदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलिसांकडून प्रवेशपत्र देण्यात येईल. तसेच जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहील, याकरिता वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करण्यात यावे, अशा सूचना शासनाचे सह सचिव राजेंद्र होळकर यांनी शासन आदेशान्वये जारी केल्या आहेत.