नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'चे नाव
नवी मुंबई ः राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात २५ ऑगस्ट रोजी शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य सरकाराने अनेक प्रस्तावांना मंजुरी दिली. त्यामध्ये नवी मुंबईतील भूमीपुत्रांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे अर्ध्वयू लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा होता. राज्य शासनाने अधिवेशनामध्ये नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देऊन स्व.दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करुन तो मंजुरीसाठी दिल्ली येथे पाठविल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. याप्रसंगी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासमवेत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार किसन कथोरे, आमदार राजू पाटील, आदि उपस्थित होते.