विना परवानगी ‘सिडको'कडून खारघर टेकडीवर खोदकाम

नवी मुंबई ः खारघर खोदकाम प्रकरणात आणखीन एक धक्कादायक वळण समोर आले आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाने ‘सिडको'ला गोल्फ कोर्स प्रकल्पासाठी खारघर टेकडीवर खोदकामाची परवानगी दिली नसल्याची बाब उघड झाली आहे. यासंदर्भात ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने सदरची बाब माहिती अधिकार अंतर्गत मिळविलेल्या माहितीनुसार पर्यावरण विभागाने त्यांच्याकडे ‘सिडको'ला खोदकाम करण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. सार्वजनिक माहिती अधिकारी (पीआयओ) आणि पर्यावरण-हवामान बदल विभागातील शास्त्रज्ञ डी. एस. भालेराव यांची यांची आरटीआयच्या माहितीवर स्वाक्षरी आहे. तसेच याबाबतचे निवेदन‘सिडको'कडे पाठविण्यात आल्याचे भालेराव यांनी सांगितले.


पर्यावरण आणि हवामान बदल विभागाकडून ‘सिडको'ला परवानगी घेणे आवश्यकअसल्यामुळे सदरचे निवेदन ‘सिडको'ला पाठवणे निरर्थक आहे, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार म्हणाले.पारसिक हिल खोदकाम प्रकरणातील ‘एनजीटी'च्या आदेशानुसार खडकाच्या कोणत्याही खाणकामासाठी पर्यावरण विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे बी. एन. कुमार यांनी स्पष्ट केले. याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील खाण मालकांची राज्य पर्यावरण प्रभाव परीक्षण संस्थेकडे परवानगीसाठी रिघ लागलेली आढळते. टेकडी कापणे म्हणजे खोदकामच आहे. सिडको  सामुग्री ट्रक भरभरुन भराव आणि खारघर गोल्फ कोर्स विस्तारासाठी वापरत आहे, असेही बी. एन. कुमार यांनी सांगितले.


‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने तक्रार केल्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी खारघर टेकडीच्या खोदकामासाठी वापरण्यात आलेली सामुग्री फेब्रुवारी महिन्यामध्ये काही दिवस सील केली होती. परंतु, ‘सिडको'ने खारघर टेकडी त्यांच्या अधिकाराच्या अंतर्गत असल्याचा दावा केल्याने रायगड जिल्हा अधिकाऱ्यांनी माघार घेतली.

सदर प्रकरणी ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'तर्फे तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पर्यावरणविभागाच्या प्रधान सचिवांना सदर प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे दोन वेळा निर्देश दिले होते. पण, त्यानंतर देखील खोदकामावर बंदी घालण्यासाठी संबंधितांकडून कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, असे बी. एन. कुमार यांनी सांगितले.


‘सिडको'च्या अशा बेपरवाईच्या कृतीचा टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी लोकांवर परिणाम झाला आहे. या लोकांना सदर क्षेत्र सामाजिक वनीकरणासाठी दिले गेले आहे. त्यामुळे ‘वन हवक समिती'च्या माध्यमातून या समुहांनी टेकडीच्या संरक्षणासाठी मानवी साखळी तयार केली होती. डोंगराच्या खोदकामामुळे कोसळणाऱ्या दरडींनी आपली घरे उध्वस्त होण्याची या आदिवसी बांधवांना भिती आहे. अशी माहिती वातावरण या पर्यावरण एनजीओचे संस्थापक-सीईओ भगवान कासभट्ट यांनी दिली. 
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'चे नाव