नवी मुंबईत अवैध धंद्यांना पोलीस अधिकाऱ्यांचे अभय
दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई- उपमुख्यमंत्री फडणवीस
नवी मुंबई : नवी मुंबईत वाहतूक विभागात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करुन कठोर कारवाई करण्याची मागणी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सुचनेद्वारे केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणात कोणीही पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल, असे सूचित यावेळी केले.
नवी मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ४ विधानसभा क्षेत्र येतात. या संपूर्ण क्षेत्रात सुमारे ५ हजार रसायनयुक्त टँकर अवैधरित्या पार्किंगच्या नावाखाली उभे असतात. टँकरच्या अवैध पार्किंगमुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. सायन-पनवेल हायवे वर लक्झरी बसेसकडूनही रक्कम घेतली जात असल्याने तेथे तासन्तास वाहतूक काेंडी होत आहे. महिला पोलिसांनाही भर उन्हात सेवेसाठी विना खाणे-पिणे कार्यरत ठेवण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
एकंदरीतच नवी मुंबईमध्ये सर्रास अनधिकृत धंदे होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून मटका, लॉटरी, जुगार, गोमांस तस्करी, अवैध दारु विक्री, डिझेल चोरी, गुटखा वाहतूक, घरफोडी, चेन स्नॅचींग, मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री, जेएनपीटीतील लालचंदन तस्करी यासारखे अनेक धंदे राजरोसपणे सुरु आहेत. अनेक ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून महिला अत्याचार, ऑनलाईन गंडा असे गुन्हे सातत्याने घडत आहेत. अशा घटनांवर नवी मुंबई पोलीस आयुक्त तसेच वाहतूक विभागाचे नियंत्रण नसून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच सर्व काही होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नवी मुंबईत २-३ वेळा बदली होऊन आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांंच्या मालमत्तेची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे याबाबत गेल्या ३ महिन्यांपासून मी आवाज उठवित असून कोणतीही कार्यवाही होत नाही, हीच अत्यंत खेदाची बाब आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सभागृहात सांगितले.