यूथ कौन्सिल, नेरुळ या समाजसेवी संस्थाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विशेष गौरव
‘अष्टावधानी नारी' सन्मानाने चित्रा बाविस्कर यांचा गौरव
नवी मुंबई ः यूथ कौन्सिल, नेरुळ या समाजसेवी संस्था द्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका नगर सचिव सौ. चित्रा बाविस्कर यांना ‘अष्टावधानी नारी' पुरस्कार ‘नेरुळ जेष्ठ नागरिक संघ'चे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
नेरुळ मधील ज्येष्ठ नागरिक भवन मध्ये २३ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात व्यासपिठावर ‘यूथ कौन्सिल'चे मुख्य सचिव सुभाष हांडेदेशमुख, ‘नेरुळ ज्येष्ठ नागरिक संघ'चे उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, ‘यूथ कौन्सिल'चे सल्लागार पत्रकार राजेंद्र घरत उपस्थित होते.
घर, परिवार सांभाळून नोकरी करत असताना केवळ तेव्हढ्यावर समाधानी न राहता पुढील उच्च शिक्षण घ्ोत सौ. चित्रा बाविस्कर यांनी लेखन, वाचन, संगीत आदी छंदही जोपासले. नोकरीतही वरचे पद मिळवण्याचा ध्यास ठेवल्याने त्यांना या उंचीपर्यंत पोहचता आले, अशा शब्दात यावेळी वाळवेकर यांनी सौ. चित्रा बाविस्कर यांचे कौतुक केले. यूथ कौन्सिल संस्था कुणाकडूनही अर्ज, विनंत्या, प्रस्ताव मागवण्याच्या सोपस्कारात न पडता स्वतः धांडोळा घ्ोऊन झाकलेल्या माणकांना गौरवते, याबद्दल वाळवेकर यांनी ‘यूथ कौन्सिल'ला धन्यवाद दिले.
यूथ कौन्सिल संस्था कोणत्याही पक्षीय राजकारणापासून दूर रहात गेली ३४ वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवते, अशी माहिती देऊन यावेळी ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आटोपशीर कार्यक्रमांतून विविध मान्यवरांना यूथ कौन्सिल संस्था तर्फे सन्मानित करण्यात येणार आहे', असे सुभाष हांडेदेशमुख यांनी जाहिर केले.
पत्रकार राजेंद्र घरत यांनी यूथ कौन्सिल आणि ज्येष्ठ नागरिक संघ या विधायक आणि सकारात्मक उपक्रमांत व्यस्त असलेल्या संस्थांशी जोडले गेलो असल्याबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त यंदा वर्षभर वयोवृध्द नामवंत, गुणवंत, प्रज्ञावंतांचा शोध घ्ोऊन त्यांचा घरपोच सन्मान करुया, अशी सूचना राजेंद्र घरत यांनी मांडली.
सौ. चित्रा बाविस्कर यांनी या सन्मानाबद्दल दोन्ही संस्थांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. नुकत्याच पार पडलेल्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अरविंद वाळवेकर यांचा ‘यूथ कौन्सिल'चे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या हस्ते शाल देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
जी. आर. पाटील, सुरजीतसिंह उभी, प्रकाश लखापते, क्षेत्रमाडे आदींच्या सक्रिय सहभागाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.