बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न ?
बाप्पाचे आगमन डेंजर झोन मधून होणार की काय ?
नवी मुंबई--: बाप्पाचे आगमन अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपले आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनापूर्वी नवी मुंबई मनपाने या खड्ड्याचे विघ्न दूर करून बाप्पाचा प्रवास निर्विघ्न करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
जुलै महिन्यात नवी मुंबई शहराला पावसाने झोडपल्यानंतर शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे ग्रहण लागले होते. मात्र या खड्ड्यांची दखल घेत मनपा आयुक्तांनी हे खड्डे युद्ध पातळीवर भरण्याचे आदेश दिले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने जोर पकडल्याने खड्डे भरण्यासाठी वापरण्यात आलेली खडी, डांबर वाहून गेल्याने अंतर्गत रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य उभे राहू लागले. त्यामुळे सालाबादप्रमाणे या वर्षीही नवी मुंबई शहरातील रस्ते खड्ड्यात गेल्याने बाप्पाचे आगमन डेंजर झोन मधून होणार की काय ? अशी भीती गणेश भक्तांना लागली आहे. गणेशोत्सवाची शहरात जय्यत तयारी सुरू झाली आहे.आता लवकरच मोठमोठ्या मंडळांच्या बाप्पाच्या आगमनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अशा रस्त्यातून बाप्पाला घरापर्यंत, गणेशोत्सव मंडळाच्या मंडपापर्यंत कसे आणायचे? असा प्रश्न आता गणेशभक्तांना पडला आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनापूर्वी शहरातील सर्व खड्डे भरून बाप्पाचा प्रवास निर्विघ्न करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.