सानपाडा येथे ‘श्रावण महोत्सव' उत्साहात संपन्न

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था तर्फे महिलांना महिलांना विशेष पर्वणी

नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सहकार्याने श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टीलायझर्स लि. आणि मिती क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सानपाडा, सेवटर-१७ मधील वडार भवन येथे उत्तरा मोने सादर करीत असलेल्या ‘उत्सव पाककलेचा-उत्सव खाद्यसंस्कृतीचा...श्रावण महोत्सव-२०२२' उत्साहात संपन्न झाला.

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील महिलांसाठी सदर विशेष पर्वणी असल्याने शेकडो महिलांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.‘महोत्सव'ची प्राथमिक फेरी संपन्न झाली असून प्राथमिक फेरीचा विषय चविष्ट कटलेट आणि स्वादिष्ट सूप असल्याने स्पर्धक महिलांनी बनवलेले विविध प्रकारचे कटलेटस्‌ आणि सूप तसेच पदार्थांनी बनवलेली सजावट या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. आदिती राऊत, सुषमा पोतदार, रुपाली लालगे, अनिता हर्डीकर, रिध्दी म्हात्रे या स्पर्धकांनी प्रथम ५ विजेत्यांमध्ये स्थान पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.


सदर स्पर्धेमध्ये मनिषा मराठे, कला जोशी, पराग बापट, स्वाती जोशी, भाग्यश्री लेले, डॉ. रेश्मा बाबरे, बिना सावर्डेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पदार्थाची चव, सजावट आणि पौष्टिकता यावर परीक्षकांनी निर्णय देत विजेत्यांची निवड केली. सदर स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांनी गौरविण्यात आले असून महोत्सवात भाग घेणाऱ्या प्रत्येक
स्पर्धकाला यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महिलांसाठी खास आकर्षण असलेल्या पैठणी साड्या देऊन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी विजेत्यांचा गौरव केला. सदर स्पर्धेची अंतिम फेरी २५ ऑगस्ट २०२२ रोजी दादर येथे होणार असून स्पर्धेतील प्रथम विजेतीला दुबईतील प्रसिध्द पेशवा रेस्टॉरंटतर्फे ४ दिवसांची मोफत दुबई टुर अनुभवता येणार आहे.

गेल्या अडीच वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेलापूर मतदारसंघात महिलांसाठी कोणतीही स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते. सद्यस्थितीत सर्व परिस्थिती आटोक्यात आली असल्याने महिलांमध्ये चैतन्य आणि उत्साह निर्माण व्हावा, याकरिता ‘श्रावण महोत्सव'चे आयोजन करण्यात आले. ‘श्रावण महोत्सव' अंतर्गत शेकडो महिलांनी एक विशेष पर्वणी म्हणून पाककला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. ‘श्रावण महोत्सव'मध्ये १८ वर्षांपासून ६८ वर्षापर्यंतच्या स्पर्धक महिला सहभागी झाल्या होत्या. विविध प्रकारच्या कटलेटस्‌ आणि पौष्टिक सूप बनवून आणलेल्या स्पर्धक महिलांचा उत्साह पाहून मला देखील स्पर्धक होण्याचा मोह आवरता येत नव्हता. महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांना या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध व्हावे असा ‘श्रावण महोत्सव'च्या आयोजनाचा मुख्य उद्देश होता. बेलापूर मतदारसंघातील ५ महिलांची अंतिम फेरीसाठी निवड झाली असून अंतिम फेरी २५ ऑगस्ट रोजी होणार असून विजेत्या महिलेला संपूर्ण कुटुंबसहित ४ दिवसांची मोफत दुबई टूर बक्षीस म्हणून मिळणार आहे. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सानपाडा येथे १८९ नागरिकांची नेत्रचिकित्सा