अभिनंदन क्रीडा मंडळ ठरले सोन्याचे हंडीचे मानकरी
नवी मुंबई :- नवी मुंबई शहरात यंदा नामांकित हंड्या रद्द झाल्याने बाळ गोपाळांचा चांगलाच हिरमोड झाला होता. मात्र सानपाड्यात पांडुरंग आमले यांनी आयोजित केलेली सोन्याची हंडी सर्वांचेच आकर्षणाचे केंद्र बनले होते आणि ही हंडी फोडण्यासाठी गोविंदाची स्पर्धा रंगली होती. अखेर काळाचौकी येथील अभिनंदन क्रीडा मंडळाच्या गोविंदाने आठ थर लावून सोन्याच्या हंडीवरआपले नाव कोरले.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. यंदा मात्र शासनाने कोविडचे सर्व निर्बंध शिथिल केल्याने गोविंदा पथकाच्या उत्साहाला उधाण आले होते. त्यामुळे शहरातील नामांकित हंड्या फोडण्याकडे गोविंदा पथकांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र यात सर्वात जास्त आकर्षण ठरली ती सानपाडा मधील सोन्याची हंडी. सानपाडा सेक्टर आठमधील पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या हुतात्मा बाबू गेनू मैदानावर शुक्रवारी दहीहंडी उत्सवानिमित्त समाजसेवक पांडुरंग आमले, भाजपा प्रभाग क्रमांक ३०, साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला सोन्याची हंडीचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही हंडी फोडण्यासाठी दिवसभर १५० हुन अधिक मंडळांनी हजेरी लावली होती. मात्र बाजी मारली अभिनंदन क्रीडा मंडळाने या मंडळाच्या गोविंदा पथकाने आठ थर लावून या सोन्याच्या हंडीवर आपले नाव कोरले. तर मानाची हंडी नेरूळ मधील एकवीरा मित्र मंडळाने फोडली. यावेळी भाजप महामंत्री नीलेश म्हात्रे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषक देण्यात आले.