ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीचे शुक्लकाष्ठ कधी संपणार ?
नवी मुंबई : ठाणे बेलापूर मार्गावरील घणसोली उड्डाणपुलावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र सदर खड्डे भरण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरूअसल्याने या मार्गावर महापे ते रबाळे अशी मागील एक महिन्यापासून रोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीचे शुक्लकाष्ठ कधी संपणार असा सवाल आता वाहन चालक करीत आहेत.
ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी फुटावी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र मार्गावर असलेली वाहनांची वर्दळ व सिग्नलमुळे ही वाहतूक कोंडी काही फुटली नाही. त्यामुळे या मार्गावर एम एम आर डी ए मार्फत दोन उड्डाण पुल व एका भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. यातील घणसोली उड्डाण पुलावर पावसामुळे खड्डे पडले आहेत आणि हे खड्डे भरण्याचे काम मनपातर्फे सुरु आहे. मात्र सदर काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने या मार्गावर महापे ते रबाळे दरम्यान रोज वाहतूक कोंडी होत आहे.
एक महिन्यापूर्वी शहरात पडलेल्या खड्ड्यांची दखल मनपा आयुक्तांनी घेतली होती व या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त खुद्द रस्तावर उतरले होते आणि सर्व खड्डे भरण्याचे निर्देश प्रशासनास दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाच्या वतीने दिवस रात्र खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. मात्र ठाणे बेलापूर मार्गावरील घणसोली उड्डाण पुलावरील खड्डे भरणीचे काम अजुनही सूरूअसल्याने वाहन चालकांसाठी डोके दुखी ठरत असून या मार्गावर रोज मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीचे शुक्लकाष्ठ कधी संपणार असा सवाल आता वाहन चालकांकडून विचारला जात आहे.