सोमनाथ वास्कर यांच्या इशाऱ्यामुळे मनपाला आली जाग
मनपा अधिकाऱ्यांनी केला सानपाडा भागाचा दौरा
नवी मुंबई -:सानपाडा गाव तसेच आजूबाजूच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याविना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी सोमवार २२ ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र सदर इशारा देताच मनपा प्रशासनाला जाग आली असून सानपाडा भागाचा पाहणी दौरा करून सदर पाण्याचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
स्वतःचे मालकीचे धरणं असलेली नवी मुंबई महानगर पालिका ही राज्यातील एकमेव महापालिका आहे. स्वतःचे धरण असल्याने नवी मुंबईकरांना २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध असेल असे आश्वासन मनपाने दिले आहे. मात्र मागील चार पाच महिन्यांपासून शहरात कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा होत आहे आणि हीच परिस्थिती सानपाडा गाव, सेक्टर ५, ३,आणि ८ परिसरात असल्याने पाण्याविना या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा म्हणुन माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी मनपा सोबत वारंवार पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता. मात्र तरी देखील पाण्याची समस्या जैसे थे वैसेच राहिली आहे. त्यामुळे सानपाडा परिसरात पाणी पुरवठा सुरळीत नाही केला तर सोमवार २२ ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र उपोषणाचा इशारा देताच मनपा पाणी पुरवठा विभागाला जाग आली असून या विभागाने सानपाडा भागाचा पाहणी दौरा करून पाणी समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करून सदर पाणी प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन सोमनाथ वास्कर यांना दिले आहे. त्यामुळे वास्कर यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित केल्याचे जाहीर केले आहे.