नवी मुंबईत सर्रास गुटखा विक्री  

शहर गुटखा-अंमली पदार्थ मुक्त कधी होणार?


नवी मुंबई ः राज्यात गुटखा, सुंगधी तंबाखू यासारखे आरोग्यास हानीकारक असलेले पदार्थ विक्री करण्यास आणि बाळगण्यास बंदी असतानाही नवी मुंबईत परराज्यातून गुटखा, सुंगधी तंबाखुसारखे पदार्थ छुप्या पध्दतीने येत असल्याचे पोलिसांकडून होत असलेल्या कारवायांवरुन दिसून येत आहे. पोलिसांकडून सदर गुटखा आणि सुगंधीत तंबाखू पकडण्यात आल्यानंतर देखील शहरातील पान टपऱ्यांवर अगदी सहजतेने गुटखा आणि सुगंधीत तंबाखू उपलब्ध होत असल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत पहावयास मिळत आहे. पोलीस तसेच अन्न-औषध प्रशासनाकडून गुटखा बाळगणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला जात असला तरी गुटख्याची विक्री थांबत नसल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत सर्वत्र दिसत आहे.  


तंबाखुजन्य पदार्थ आरोग्यास हानीकारक असल्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे जीवही जातो. त्यामुळे तरुणांना व्यसनाधिनतेपासून दूर ठेवून निरोगी, सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी राज्यात हातभट्टी दारु, गुटखा, मावा आदिंच्या विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचे काटेकोर पालन होत नसल्याने काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्या आश्रयाखाली अवैध व्यवसाय चालत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.  


इतर राज्यात गुटखा उत्पादनास बंदी नसल्याने या राज्यातून तस्करी करुन खुष्कीच्या मार्गाने विविध वाहनांचा वापर करुन गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थ महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचे पोलिसांकडून करण्यात आलेल्या विविध कारवायांवरुन दिसून आले आहे. तस्करी करुन राज्यात आलेल्या गुटखा, सुगंधीत तंबाखुच्या विक्रीची दरवर्षीची उलाढाल कोट्यावधींच्या घरात असल्याचे बोलले जाते. राज्याच्या सीमेवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा असा प्रश्न? या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.  


नवी मुंबईत २०२१ या वर्षामध्ये गुटखा आणि इतर तंबाखुजन्य पदार्थाच्या एकूण १२० कारवाया पोलिसांकडून करण्यात आल्या असून यात विविध पोलीस ठाणे अंतर्गत ८४ तर गुन्हे शाखेकडून ३६ कारवाया करण्यात आल्या आहेत. सदर एकूण कारवायांंतर्गत तब्बल १ कोटी २५ लाख ७३ हजार रुपयांचा गुटखा, पानमसाला तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थ जप्त करुन एकूण ३५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर देखील नवी मुंबईत छोट्या-छोट्या पान टपऱ्यांवर दुकानांमध्ये गुटख्याची खरेदी विक्री सुरुच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नवी मुंबई शहराला गुटखा आणि अंमली पदार्थ मुक्त करण्याचा नारा ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे शहरात अंमली पदार्थ आणि गुटखा तसेच तंबाखुजन्य पदार्थाच्या खरेदी विक्रीमध्ये वाढ होत असल्याने शहर गुटखा आणि अंमली पदार्थ मुक्त कधी होणार? असा प्रश्न नवी मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुंबई पाठोपाठ नवी मुंबई महापालिका मार्फत सुविधा