नारळी पौर्णिमा निमित्त आगरी कोळ्यांच्या उत्साहाला उधाण

नवी मुंबई--: 'सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवचा' अशी गाणी म्हणत आणि ढोल ताशा व बेंजो च्या तालावर थिरकत नवी मुंबईतील आगरी कोळी ग्रामस्थांनी दर्या राजाला नारळ अर्पण करत  नारळी पौर्णिमेचा  सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मागिल दोन वर्ष कोवीड मुळे हा सण साधेपणाने साजरा करण्यात आला होता.मात्र यंदा शासनाने कोवीडचे सर्व निर्बंध शिथिल केल्याने हा सण साजरा करताना आगरी कोळ्यांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.

वर्षभर आपला उदर निर्वाह करणाऱ्या व आपला सांभाळ करणाऱ्या  दर्या राजाला नारळ अर्पण  पूजा करून नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवी मुंबईला २९ किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असनु या किनाऱ्यावर राहणाऱ्या, दिवाळे गाव, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी गाव, जुहूगाव, बोनकोडे, कोपेरखैरणे, घणसोली, तळवली गाव, दिवा गाव, ऐरोली गाव, नेरुळ गाव आदी गावांमध्ये दरवर्षी  नारळी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरी करण्यात येते.  यात लहान सहान मुलांपासुन ते अगदी जेष्ठ नागरीक आपल्या पारंपरिक आगरी कोळी वेशात पालखी नाचवत दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी जात असतात. यात सर्वात आकर्षणाची  प्रतिष्ठेची व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर मानली जाणारी सारसोळे कोळीवाड्याची नारळी पौर्णिमा पारंपारिक नृत्याच्या आविष्कारामध्ये पार पडली. मागील दोन वर्ष कोवीड मुळे सणांवर निर्बंध आले होते. त्यामुळे दोन वर्ष अत्यंत साधेपणाने नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली होती. मात्र यंदा राज्यशासनाने कोवीडचे सर्व निर्बंध शिथिल केल्याने यंदाचा नारळी पौर्णिमा सण साजरा करताना आगरी कोळ्यांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.

यावेळी पालखी सोहळ्यामध्ये  पालखीला खांदा लावण्यासाठी  आमदार मंदाताई म्हात्रे, माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेवक सुरज पाटील, रूपाली भगत, नगरसेविका सुजाताताई सुरज पाटील, गणेश भगत, नामदेव भगत, रतन मांडवे आदी उपस्थित होते.

दर्याराजाला नारळ अर्पण

वर्षभर आपला उदर निर्वाह करणाऱ्या व आपला सांभाळ करणाऱ्या दर्या राजाला आज नारळ देऊन पूजा केली जाते. या दिवशी सर्व आगरी कोळी बांधव आपल्या होड्यांची विधिवत पूजा करतात. त्यानंतर मासेमारी  साठी होड्या  समुद्रात सोडतात.तर  दर्याराजाने  आपल्या सौभाग्याचं  रक्षण करावे म्हणून महिला वर्ग साकडे घालतात. तर या दिवशी घरात गोड धोड नैवद्य केले जाते त्यात पुरण पोळीचा मुख्य समावेश असतो .

आमदार मंदा ताई म्हात्रे यांच्या कडून तिरंग्याचे वाटप

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ हे अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सारसोळे जेट्टिवर नारळी पौर्णिमा सण साजरा करण्यासाठी  आलेल्या आगरी कोळी बांधवांना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी तिरंग्याचे वाटप करत १३ ते १५  रोजी आपल्या घरी तिरंगा फडकावण्याचे आवाहन केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत होड्यांवर फडकवला तिरंगा