सानपाड्यात १५ हजार घरांवर फडकणार तिरंगा
नवी मुंबई -:. यंदा १५ ऑगस्ट, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्ययोध्यांचे स्मरण, नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान अधिक जागविणे हाच मूळ उद्देशाने देशाचे समर्थ नेतृत्व करणारे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी "हर घर तिरंगा" हा अभिनव उपक्रम संपूर्ण हिंदुस्तानात साजरा करण्याचे आवाहन केलेले आहे. त्या अनुषंगाने माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांच्या पुढाकाराने सानपाड्यात १५ हजार घरांवर तिरंगा फडकणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन सर्वांना मोठ्या अभिमानाने साजरा करता यावा यासाठी वाशीगाव, वाशी सेक्टर-३०, सानपाडा- सोनखार मधील सर्व सेक्टर तसेच जुईनगर सेक्टर २२, २३ मधील प्रत्येक घरोघरी अशा एकूण १५ हजार घरांमध्ये १३ तारखेपासून राष्ट्रध्वज फडकला पाहिजे यासाठी आमदार गणेश नाईक यांच्या प्रेरणेने माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली निशांत भगत, वैजयंती भगत आणि संदिप भगत यांच्या प्रत्यक्ष सहभागातून तिन्ही प्रभागातील युवक कार्यकर्ते, महिला भगिनी व जेष्ठ नागरिक हे एकत्रित बसून "घर घर तिरंगा" सोबतच अमृतमहोत्सवी शुभेच्छापत्रे व प्रत्येक घरात स्मरणपर टेबल स्टँडी या सामग्रीची सामूहिकरित्या बसून लिफाफा बंद करण्याच्या कार्यात सहभागी झालेले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सानपाडा सेक्टर १६ येथील गुणीना मैदानात तिन्ही प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक व विविध खेळांतील खेळाडू आणि व्यावसायिक त्याचप्रमाणे नागरिक हे अमृतमहोत्सवानिमित्त एकात्मतेचा संदेश मानवी आरास करून व देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजनातून देणार आहेत. तसेच पामबीच (सोनखार) जेष्ठ नागरिक सेवा समितीच्या वतीने सोनखार विभागात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जनजागृतीपर प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर वाशीगाव येथील स्व. प्रेमनाथ पाटील चौकातून सानपाडा- सोनखार पर्यंत मोटर बाईक रॅलीचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.