अपूर्ण नालेसफाईचा नागरीकांना नाहक त्रास
नवी मुंबई -: तुर्भे इंदिरा नगर मध्ये मनपाच्या वतीने मान्सून पूर्व गटारांची धूळफेक सफाई केल्याने रविवारी या भागातील रहिवाशांच्या घरा घरात पाणी शिरले होते. त्यामुळे या पाण्याचा निचरा करण्यासाठी येथील रहिवाशांवर स्वतःहुन गटार साफ करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे बोगस नालेसफाई करून नागरीकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
मनपाच्या वतीने मान्सून पूर्व नालेसफाई पूर्ण केल्याचा दावा केला जात आहे. मात्र ही सफाई योग्य रित्या होत नसल्याने आज शहरात जागो जागी पाणी भरून नागरीकांचे हाल होत आहेत. हीच परिस्थिती तुर्भे इंदिरा नगरमध्ये आहे. या भागात बंदिस्त गटारांची धूळ फेक सफाई करण्यात आली आहे. नालेसफाई योग्य न केल्याने पुन्हा एकदा या भागात रविवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी रहिवाशांच्या घराघरात पाणी भरले होते आणि या पाण्याचा निचरा करण्यासाठी या भागातील रहिवाशांवर स्वतः हुन गटार साफ करण्याची नामुष्की ओढवली होती. याबाबत शिवसेना विभाग प्रमुख महेश कोटीवाले यांनी वारंवार तक्रारी करून देखील स्वच्छता निरीक्षकांकडून संबंधित ठेकेदारास पाठीशी घालण्याचे काम करीत आले आहेत. त्यामुळे येत्या गणेशोत्सवापूर्वी या भागातील गटारे साफ न केल्यास या गटारातील गाळ मनपा अधिकाऱ्यांच्या दालनात फेकला जाईल असा इशारा महेश कोटीवाले यांनी दिला आहे.