आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने तिरंगा महोत्सव

१३-१४ ऑगस्ट रोजी बेलापूर मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन

 नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) या उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सदर महोत्सवात विविध क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करावयाचा असून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून आपल्या घरावर तसेच सर्व शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल तसेच विविध प्रकारच्या खासगी आस्थापना यांनी १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवशी स्वतःहून पुढाकार घेऊन राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील विविध सोसायट्या, झोपडपट्टी क्षेत्र, लोक वसाहती  याठिकाणी नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात येत असून घरोघरी तिरंगा उपक्रमात नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकाविणे अपेक्षित आहे. ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा यथोचित सन्मान राखला जाईल याची दक्षता नागरिकांची घ्यावयाची आहे.


 आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या तुर्भे येथील भाजपा कार्यालय पासून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. १३ ऑगस्ट रोजी सायं. ५ वाजता नवी मुंबई भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, नेरुळ येथून बाईक रॅली काढण्यात येणार असून सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी चौक येथे भाजपा उपाध्यक्ष संपत शेवाळे यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ढोल-ताशांच्या गजरात पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता श्री गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वार, एनआरआय सागरी पोलीस स्टेशन समोर, पामबीच मार्ग सीबीडी-बेलापूर येथे भव्य तिरंगा यात्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर यात्रेमध्ये विविध क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देणार असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या युगपुरुषांचे पात्र तिरंगा यात्राचे प्रमुख आकर्षण असणार आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजता विभाजन विभिशिका स्मृती दिन निमित्त नेरुळ, सेवटर-२ राजीव गांधी ब्रीज आणि सानपाडा, सेवटर-७ पोलीस चौकी येथे मौन यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.


दरम्यान, बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक संस्था, महिला बचत गट, युवा वर्ग, विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा, असे आवाहन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अपूर्ण नालेसफाईचा नागरीकांना नाहक त्रास