खासगी बस चालकांवर असणार आरटीओची करडी नजर
नवी मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी चाकरमाण्यांची मोठी लगबग असते. मात्र याचा गैर फायदा घेत गावी जाणाऱ्या या प्रवाशांकडून खाजगी बस चालक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लुटमार करीत असतात. मात्र अशा या लूटमारीला आता आळा बसणार आहे. परिवहन विभागाच्या वाशी उप प्रादेशिक कार्यालयाची या बसेसवर करडी नजर असणार असून ज्यादा भाडे आकारणाऱ्या अशा बसेसवर कारवाई केली जाणार आहे.
गौरी गणपती सण हा कोकणात सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो आणि या सणासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरतुन हजारो कोकणवासीय गणपती निमित्त गावी जात असतात. कोकणात रेल्वे मार्गाचा विचार केला तर तो सगळ्यात स्वस्त असल्याने बहुतेकांची धाव तिकडेच असते. मात्र गाडय़ांची संख्या मर्यादित असल्याने रेल्वेचे आरक्षण कितीतरी आधी ‘फुल्ल’ होऊन जाते. एसटीच्या निमआराम बसगाडय़ा देखील या मार्गावर धावतात, गणपती निमित्त एसटी जादा बसगाडय़ाही चालवत असतात. परंतु आरामदायक (शक्यतो झोपून) प्रवासाची सवय असलेले व प्रवासी खाजगी बसगाडय़ांना अधिक पसंती देतात. त्यामुळे जागा मर्यादित आणि गरजू प्रवाशांची संख्या जास्त या अनुकूल परिस्थितीचा फायदा खाजगी बसगाडय़ांचे मालक गेल्या काही वर्षांपासून सणांच्या तोंडावर पुरेपूर घेत आलेले आहेत. आणि ऐन सणासुदीला हे खाजगी बसधारक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूट करतात.
मात्र अशा या लूटमारीला आता आळा बसणार आहे. परिवहन विभागाच्या वाशी उप प्रादेशिक कार्यालयाची या बसेसवर करडी नजर असणार असून ज्यादा भाडे आकारणाऱ्या अशा बसेसवर कारवाई केली जाणार आहे. तसेच खाजगी बस चालकांनी काय दर आकारले पाहिजे याचे दरपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.
परिवहन विभागाकडून सरासरी पेक्षा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आलेल्या आलेत. बस चालकांनी काय दर आकारावे याचे दर पत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर खाजगी बसेसवर आमची नजर राहणार असून त्यांची तपासणी करण्यात येईल आणि जर खाजगी बस ज्यादा भाडे आकारल्याचे आढळून आल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. - हेमांगीनी पाटील, उप प्रादेशिक अधिकारी वाशी,