वाशीतील रस्त्यांवर पसरले चिखलाचे साम्राज्य
नवी मुंबई -: वाशी सेक्टर नऊ, दहा मध्ये पुनर्विकास कामे सुरूअसून यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकामे सुरू आहे. मात्र, सदर खोदकामचा राडारोड्याची वाहतूक करताना तो रस्त्यावर पडत असल्याने या भागातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनचालक व प्रवाशांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होताना दिसत आहे आणि या साऱ्या प्रकाराकडे मनपा आणि वाहतूक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
मागील बरीच वर्ष रखडलेल्या वाशीतील पुनर्विकास कामांना आता परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे या भागातील इमारती पाडून त्या जागी नवीन इमारती बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकामे सुरू आहेत आणि खोदलेला राडारोडा वाहनातून शहरा बाहेर नेला जातो. मात्र सदर राडारोड्याची वाहतूक करताना वाहन चालक योग्य काळजी घेत नसून तो वाहनातून रस्त्यावर पडला जातो. त्यामुळे या सर्व वाहनांतून रस्त्यांवर सांडणाऱ्या राडारोड्यामुळे रस्त्याची दुरावस्था होऊन रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होत आहे. त्यामुळे रस्ता निसरडा होत आहे .तर या निसरड्या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन घसरून अपघात होण्याची भीती निर्माण होत आहे. तर या रस्त्यावरून शाळकरी मुले देखील मोठ्या प्रमाणात ये जा करीत असतातआणि अशा या चिखलमय रस्त्यामुळे पादचारी, विद्यार्थी व वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मनपा आणि वाहतूक विभागाने कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
शाळांच्या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवण्याची मागणी
वाशी सेक्टर ९ आणि १० मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत. त्यामुळे या ठिकाणी रोज हजारो विद्यार्थी येत असतात. मात्र याच ठिकाणी पुनर्विकास कामे सुरू असून त्या कामाचा राडारोडा अवजड वाहनांतून केला जात आहे. वाशी विभागात अवजड वाहनांना प्रवेश निषिद्ध आहे. मात्र तरी देखील वाहतूक विभागाच्याआशिर्वादाने या परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते, त्यामुळे येथे वाहतूक कोंडी सोबतच विद्यार्थ्याच्या जीवाला देखील धोका आहे. त्यामुळे किमान शाळा भरते वेळी आणि सुटते वेळी किमान एक एक तास तरी या भागात अशा अवजड वाहनांची वाहतूक थांबवावी अशी मागणी होत आहे.
एकीकडे मनपा करोडो रुपये खर्च करून रस्ते बनवत आहे. तर दुसरीकडे असे अवजड वाहन चालक रस्त्यावर राडा रोडा टाकून रस्त्याची दुर्दशा करीत आहे आणि साऱ्या प्रकाराकडे वाहतूक विभाग आणि मनपा प्रशासन डोळेझाक करीत आहे. तसेच अवजड वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांना देखील धोका संभवत असून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे किमान शाळांच्या वेळेत तरी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात यावी. - विकास सोरटे, सामाजिक कार्यकर्ते, वाशी