भारतीय नौदलाकडून सागरी, खाडी किनारी भागात सुरक्षा जागरुकता व डेटा संकलन मोहिम
भारतीय नौदल व सागरी सुरक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने समुदाय संपर्क अभियान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेकडुन सागरी किनारी भागात सुरक्षा जागरुकता आणि डेटा संकलन अभियान राबविण्यात येत असून या मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी बेलापुर येथील दिवाळे कोळीवाडा येथे भारतीय नौदल व सागरी सुरक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने समुदाय संपर्क अभियान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर डेविड सिंह, कोस्ट गार्ड प्रधान अधिकारी, पी.एम.सतदेव, ओएनजीसीचे सुरक्षा निरीक्षक अधिकारी, स्वनिल आर.ठाकुर व सुनिल कुमार आदींनी सागरी सुरक्षा संदर्भात तसेच सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने मच्छिमार बांधव, सागर रक्षक दल व ग्रामरक्षक दल सदस्यांना मार्गदर्शन केले.
मासेमारी बांधव, सागर रक्षक दल व ग्राम रक्षक दल सदस्य यांच्यात सागरी सुरक्षा जागरुकता तसेच सागरी सुरक्षितेच्या दृष्टीने सतर्कता आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर व ओएनजीसीच्या सुरक्षा अधिका-यांनी सागरी सुरक्षेसंदर्भात महत्व पटवून देताना मासेमारी करणा-या बांधवानी मासेमारीकरिता खोल समुद्रात जाताना सतर्क रहावे, व्ही.एच.एफ वायरलेस सेट, मोबाईल फोन सोबत घेवुन जाणे, बोटींमध्ये सुरक्षेकरिता जीव रक्षक साधन सामुग्री जवळ बाळगणे व मासेमारी करिता जे मार्ग देण्यात आलेले आहेत त्याच मार्गाचा वापर करावा असे सुचित केले.
तसेच मासेमारी करीत असताना नियमितपणे बोटींची मुळ कागदपत्रे व बोटीवर असलेल्या प्रत्येकाकडे फोटो, आयडी कार्ड जवळ बाळगावे. समुद्रात कोणत्याही प्रकारची अनोळखी बोट आढळुन आल्यास तात्काळ दुरध्वनी क्रमांक 22751026/1022/1031 वर तसेच एम.आर.सी.सी. टोल फ्री क्रं.1554, ओएनजीसी हेल्पलाईन 1800221956 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी सागरी सुरक्षा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी देखील सागर रक्षक दल, ग्रामरक्षक दल, मच्छिमार बांधवांनी सागरी सुरक्षेच्या संदर्भात सतर्क राहुन सागरी-खाडी किनारीभागात संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे सागरी सुरक्षेसंदर्भात सुरु करण्यात आलेल्या कोस्टल हेल्पलाईनवर (1093) देण्याचे आवाहन केले.
यावेळी एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, सागरी सुरक्षा शाखा, नौका विभागाचे साईनाथ दळवी, मत्स्य विकास अधिकारी नंदकुमार पाटील, खांदेवाले मासेमारी सोसायटी अध्यक्ष रमेश हिंडे, डोलकर मासेमारी सोसायटी अध्यक्ष पांडुरंग कोळी, फगवाले मासेमारी सोसायटी अध्यक्ष भालचंद्र कोळी व जेष्ठ नागरीक संस्था अध्यक्ष चंद्रकांत कोळी, दिवाळे कोळीवाडा सामाजिक संस्था अध्यक्ष भुषण कोळी व सागरी-खाडी किनारी गावातील सुमारे 150 सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार बांधव उपस्थित होते.