महापालिका अधिकाऱ्यांचा मनमौजी कारभार
वाशी ः सध्या नवी मुंबई महापालिका मध्ये प्रशासक राजवट सुरू आहे. मात्र, महापालिका अधिकारी नवी मुंबई शहराला एखाद्या केंद्रशासित प्रदेश असल्यासारखे बघत असून, मनमौजी कारभार करत नवी मुंबई शहरात अनावश्यक कामे करत सुटले आहेत. सध्या कार्यरत असलेले महापालिका अधिकारी तर निघून जाणार आहेत. मात्र, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भविष्यात नवी मुंबई शहराला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असे मत माजी आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई शहरासमोर आज आरोग्य, शाळा असे ज्वलंत प्रश्न असताना महापालिका प्रशासन स्वच्छ भारत अभियान तसेच अनावश्यक कामे काढून वारेमाप पैसे खर्च करीत सुटले आहेत.जर एखाद्या महापालिका मध्ये नगरसेवक नसतील तर महापालिका आयुक्त कुटुंब प्रमुख म्हणून काम पाहतात. त्यामुळे कुटुंब प्रमुखाने शहराच्या हिताचे निर्णय घण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना आज दिसत नाही. सध्या नवी मुंबई शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत नागरी सुविधा देण्यासाठी मोठे भूखंड लागणार आहेत. परंतु, नवी मुंबई शहरातील भूखंड शाबूत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने कुठलीच पाऊले उचलली नसल्याने ‘सिडको'ने भूखंडांची विक्री केली. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी देखील मनमानी कारभार चालवत भूखंड विक्री सुरु ठेवली आहे. त्यामुळे भविष्यात रस्ते कसे वाढवणार?, असा प्रश्न माजी आमदार संदीप नाईक यांनी उपस्थित केला आहे.
अधिकारी वर्गाचा एखाद्या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असण्याची, शहराचा दूरगामी विचार करुन पुढील पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. मात्र, नवी मुंबईतील सर्वच शासकीय अधिकारी असा विचार करताना दिसत नाही. याबाबत जर लोकनेते गणेश नाईक यांनी आवाज उठवला तर आ. गणेश नाईक राजकारण करत आहेत, असा कुभांड विरोधक उभे करतात. मात्र, आ. गणेश नाईक यांना नवी मुंबई शहराची चिंता असल्याने ते वारंवार आवाज उठवत आहेत. आज नवी मुंबई शहराची वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली आहे. परंतु, याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज असताना नको तिथे उड्डाणपूल उभारुन महापालिकेची तिजोरी रिकामी केली जात आहे. सध्या जर ठाणे-बेलापूर मार्गावरील महापे उड्डाणपुलाला लहान अतिरिक्त पलाची जोडणी केली तर घणसोली आणि कोपरखैरणे मधील निम्मी वाहतूक कोंडी फुटणार आहे. मात्र, यावर महापालिका प्रशासन काम करतांना दिसत नाही, असेही माजी आमदार संदीप नाईक यांनी नमूद केले.
नवी मुंबई शहरात नगरसेवक अस्तित्वात नसल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासन एकतर्फी निर्णय घेत सुटले होती. मात्र, या चुकीच्या निर्णयाविरोधात आ. गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्तांसोबत ६० पेक्षा अधिक बैठका घेऊन महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवला. याशिवाय नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या हिताचे प्रश्न महापालिका आयुक्तांसमोर मांडून अप्रत्यक्ष समांतर महासभा चालवली, असा दावा माजी आमदार संदीप नाईक यांनी केला.