खारघर मध्ये मलमिश्रित पाणी रस्त्यावर

खारघरमध्ये मलमिश्रित पाणी रस्त्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

खारघर ः खारघर सेक्टर-१५, १९ परिसरात मलमिश्रित पाणी रस्त्यावर जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने स्थानिक रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या मलमिश्रित पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता असून, याबाबत ‘सिडको'ने वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी माजी नगरसेविका संजना समीर कदम यांनी ‘सिडको'कडे निवेदनाद्वारे केली आहे.


‘सिडको'ने खारघर सेक्टर-१७ मधील वास्तुविहार गृहनिर्माण सोसायटी शेजारी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. मात्र, सदर सांडपाणी प्रक्रिया केंद्रात खारघर सेक्टर-१५ मधील घरकुल, स्पॅगेटी, वास्तुविहार, सेलिब्रेशन, खारघर सेक्टर-१८ आणि खारघर सेक्टर-१९ परिसरातील सोसायटी मधील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने या सोसायटीतील मलमिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास मलनिःसारण वाहिन्या भरुन सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. खारघर सेक्टर-१५ ते सेक्टर-१९ परिसरातील लोकसंख्या चाळीस हजाराच्या घरात असून, रस्त्यावर येत असलेल्या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. सदर समस्या संजना कदम यांनी ‘सिडको'चे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांची भेट घेवून निदर्शनास आणून दिली. मात्र, अजूनही ‘सिडको'कडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. दरम्यान, संजना कदम यांनी माजी नगरसेवक परेश ठाकूर यांच्या निदर्शनास सदर समस्या आणून दिल्यानंतर त्यांनी  पनवेल महापालिकेच्या मलनिःसारण वाहिनीचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना या समस्याकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे.


दरम्यान, खारघर मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील दोन्ही पंप सुरु आहेत. तसेच सांडपाणी निचरा होत नसलेल्या ठिकाणी पाहणी करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली आहे, असे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका अधिकाऱ्यांचा मनमौजी कारभार