31 जुलैला साहित्यिक प्रा.डॉ.शरद गायकवाड व्याख्यानातून उलगडविणार साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा प्रेरक जीवनप्रवास  

नवी मुंबई :  कथा, कादंबरी, नाट्य, चित्रपट, पोवाडे, वग, प्रवासवर्णन असे साहित्यातील विविध प्रकार लिलया हाताळणारे व सर्वसामान्यांच्या जीवनाला साहित्यकृतींतून अजरामर करणारे थोर साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामामध्ये आपल्या ओजस्वी पोवाडे, पदे, लोकगीतांनी जनजागृती करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा संपूर्ण जीवनपट अलौकिकतेची ग्वाही देणारा आहे. केवळ दीड दिवसांची शाळा पाहिलेल्या या महनीय व्यक्तीने स्वकर्तृत्वाने अजोड साहित्यकृती निर्माण केल्या, ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.

अशा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास विशेष व्याख्यानाव्दारे उलगडला जात आहे. 1 ऑगस्ट 2022 रोजी साज-या होत असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीदिनांचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार, 31 जुलै 2022 रोजी, सायं, 6 वा., ऐरोली सेक्टर 15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते प्रा.डॉ.शरद गायकवाड विशेष व्याख्यानातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा जीवनप्रवास उलगडणार आहेत.   

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15, ऐरोली येथे उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या विचारसूत्रावर आधारित वाड्.मयीन स्मारक म्हणून नावाजले जात आहे. या ठिकाणी महत्वाच्या दिवसांचे औचित्य साधून नामवंत वक्त्यांची विविध विषयांवरील व्याख्यांने आयोजित करुन नागरिकांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करुन दिली जात आहे. ‘विचारवेध’ अंतर्गत संपन्न झालेल्या सर्व कार्यक्रमांना तसेच बाबासाहेबांच्या जयंतीनिमित आयोजित ‘जागर’ या विशेष व्याख्यानमालेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे.     

  याच धर्तीवर ‘विचारवेध’ शृंखलेअंतर्गत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाविषयी सर्वांगीण माहिती देणारे ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे – जीवनप्रवास’ या विषयावरील व्याख्यान ऐकण्यासाठी व यामधून अण्णा भाऊंची महानता समजून घेण्यासाठी  रविवार, दिनांक 31 जुलै 2022 रोजी, सायं. 6 वाजता, सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 
 
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हर घर तिरंगा’ या अभिनव उपक्रमात तिरंगा शिवणकामात नवी मुंबई बचत गटाचा सहभाग