श्रावणातील रानभाज्या पनवेलकरांच्या भेटीला
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम म्हात्रे यांची जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते स्वर्गीय भगवानदादा पालव यांची नात सौ.सुनेत्रा अरुण पालव यांच्या ट्रायबल ग्रीन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्रावण महिन्यातील येणाऱ्या विविध प्रकारच्या नैसर्गिक भाज्यांचे लोकांच्या माहितीसाठी प्रदर्शन आणि विक्री याचे एकदिवसीय "रान-भाजी महोत्सवाचे आयोजन" करण्यात आले आहे.
जून महिन्यानंतर पावसाळ्यात दुर्गम डोंगराळ भागात फक्त दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीसाठी या रानभाज्या येतात ज्या पुढे वर्षभर आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु या रानभाज्यांचे आपल्या शरीराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्त्व असते या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात विविध आवश्यक असलेले क्षार मिळतात, त्यांची कमी या दोन महिन्यात भरून निघते या गोष्टींसाठी नागरिकांनी या एकदिवसीय रानभाजी महोत्सवाला स्वतःसाठी-स्वतःच्या आरोग्यासाठी नक्की भेट द्यावी असे ट्रायबल ग्रीन्स संस्थेच्या सुनेत्रा पालव (बॅचलर ऑफ सायन्स ,बॉटनी) यांनी माहिती दिली.
31 जुलै 2022 रोजी व्ही. के. हायस्कूल सभागृह, पनवेल येथे सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 या वेळेत हा रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना श्री.प्रितम म्हात्रे म्हणाले "श्रावण महिन्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या गोळा करून आपले आदिवासी बांधव शहरांमध्ये विक्रीसाठी येतात,परंतु त्या भाजी विषयी जनजागृती नसल्यामुळे शहरातील नागरिक या भाज्या सहजासहजी विकत घेत नाहीत.ही गोष्ट लक्षात घेऊन मी याबाबतीत पुढाकार घेऊन या रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याचा मानस या क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रायबल ग्रीन्स यांच्यासोबत एक दिवसीय "रानभाजी महोत्सवाचे" आयोजन केले आहे जेणेकरून माझ्या आदिवासी बांधवांना त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या रानभाज्यांची प्रदर्शन आणि विक्रीसाठी एक ग्राहक पेठ निर्माण होईल हा यामागचा उद्देश आहे. शहरीकरणाच्या माध्यमातून माझ्या ग्रामीण भागातील बांधवांना अशा प्रकारच्या उपक्रमातून रोजगाराची संधी निर्माण होईल."
सर्व नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले आहे.