झाडांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यास महापालिका प्रशासनास अनेक अडचणी
वाशी ः नवी मुंबई महापालिका मार्फत ३५१ कोटी रुपये खर्चून वाशी येथील महात्मा फुले भवन ते कोपरी गाव पर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपूल प्रकल्पात ३९० झाडांचा बळी जाणार आहे. यावरुन मोठे राजकीय वादंग माजले होते. त्यावर महापालिका उद्यान विभागाने ३० दिवस हरकती करीता मुदतवाढ दिल्यानंतर १९०६ हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र, यातील बऱ्याच हरकतींवर अपूर्ण पत्ता, काहींचे फोन नंबर बंद असून, काहींना हरकतींबाबत थांगपत्ताच नाही. त्यामुळे सदर हरकतदारांसोबत संपर्क साधण्यास अडचणी येत असल्याने सुनावणी घेण्याबाबत पेच मोठा निर्माण झाला आहे.
नियोजित कोपरी गाव-वाशी उड्डाणपुलाच्या कामात ३९० झाडे बाधित होत असून, त्यापैकी ३८६ झाडे प्रत्यारोपण आणि ४ झाडे तोडण्याची परवानगी प्रक्रिया राबवली जात आहे. या विरोधात आमदार गणेश नाईक यांनी आवाज उठवला होता. या प्रक्रियेला आक्षेप घेत आ. गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर महापालिका प्रशासनाने या प्रक्रियेला हरकत घेण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ दिली. यावर सुमारे १९०६ व्यवतींनी वृक्षतोडी विरोधात हरकती नोंदवल्या आहेत. २० जून २०२२ रोजी हरकत घेण्यासाठी अखेरची तारीख होती. मात्र, यातील बहुतांश हरकतदारांसोबत संपर्क साधण्यास महापालिका प्रशासनाला मोठ्या अडचणी येत आहेत. हरकती आल्यानंतर महापालिका उद्यान विभागाकडून सुनावणी करीता संबधित हरकतदारांस पत्र लिहून सुनावणीची वेळ आणि दिनांक कळवला जातो. मात्र, कोपरी गाव - वाशी उड्डाणपुलाच्या बाबतीत आलेल्या हरकतींपैकी अनेत हरकतदारांचे पत्ते अपूर्ण असून, काहींचे फोन बंद आहेत. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने संपर्क साधलेल्या अनेक हरकतदारांपैकी अनेकांना हरकती बाबत काही कल्पनाच नाही. तसेच बऱ्याच हरकती या एक सारख्या आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या गेलेल्या हरकतदारांना अंधारात ठेऊन काही राजकीय नेत्यांनी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या हरकती नोंदवल्या आहेत का?, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकूणच, झाडांच्या अपूर्ण हरकतींवर सुनावणी घेण्यास महापालिका प्रशासनाला मोठ्या अडचणी येत आहेत.
नियोजित कोपरी गाव-वाशी उड्डाणपुलाच्या कामात बाधित होणारी झाडे वाचावी, याकरिता भाजप आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आ. गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, संजीव नाईक यांच्या समवेत भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून चिपको आंदोलन केले होते. याच आंदोलनाच्या शेजारी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खुद्द माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक वैभव गायकवाड, दिव्या गायकवाड, राजू शिंदे या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील आंदोलन केल्याने झाडांचा प्रश्न चांगलाच रंगला होता. दुसरीकडे ऐरोली मध्ये स्थानिक नेते अनंत सुतार यांनी सह्यांची मोहीम राबवत झाडे वाचावी, याकरिता आंदोलन पेटवत ठेवले. झाडांच्या बचावासाठी राजकीय पातळीवर जोरदार श्रेय बाजी रंगल्याने महापालिका प्रशासनाने एक महिन्यांची मुदतवाढ दिल्यावर आता १९०६ व्यवतींनी हरकती महापालिका उद्यान विभागाकडे नोंदवल्या आहेत. मात्र, यातील बऱ्याच हरकती या अपूर्ण असल्याने या हरकती आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यामुळे या अपूर्ण हरकती नेमक्या नोंदवल्या कुणी?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
---------------------------------------------------------
नियोजित कोपरी गाव - वाशी उड्डाणपुलाच्या बाबतीत आलेल्या १९०६ हरकतींपैकी अनेक हरकतींमधील पत्ते अपूर्ण आहेत. काहींचे फोन बंद आहेत. महापालिका प्रशासनाने संपर्क साधलेल्या अनेक हरकतदारांपैकी अनेकांना हरकती बाबत काहीच माहिती नाही. तसेच बऱ्याच हरकती या एक सारख्या आहेत. त्यामुळे याबाबतीत महापालिका उद्यान उपायुक्त यांच्यासोबत चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. उर्वरित हरकतदारांना पत्र लिहून त्यांची सुनावणी लवकरच घेतली जाणार आहे. - सुबोध ठाणेकर, वृक्ष अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, तुर्भे - नवी मुंबई महापालिका.