खाजगी रुग्णालयांचा लससाठा पालिकेने खरेदी करून ईडब्ल्यूएस वर्गासाठी वापरावा

आयुक्त बांगर यांच्याकडून महत्त्वाच्या मागण्या मान्य

नवी मुंबई : खाजगी रुग्णालयांना देण्यात आलेला 25 टक्के कोरोना लससाठा नवी मुंबई महापालिकेने खरेदी करून तो आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गासाठी वापरावा,अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर  यांना केली आहे.

कोरोना उपाययोजनांबाबतची नियमित बैठक बुधवारी पार पडली.  या बैठकीमध्ये नाईक यांनी केलेल्या महत्त्वाच्या सूचना आयुक्त बांगर यांनी मान्य केल्या. याप्रसंगी सर्व नवी मुंबईकरांना पालिकेने मोफत लस द्यावी या मागणीचा नाईक यांनी पुनरुच्चार केला. सात महिन्यांपूर्वी नाईक यांनी महापालिका प्रशासनाला अर्थसंकल्पातील निम्मा हिस्सा हा आरोग्य सुविधांसाठी वापरण्याचा सल्ला दिला होता. त्याचप्रमाणे 150 कोटी रुपयांचा निधी वापरून सर्व नवी मुंबईकरांचे लसीकरण करण्याची मागणी केली होती.  नवी मुंबईतील शहर ,गावभाग आणि झोपडपट्टी परिसरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना कोरोनाची लस घेणे परवडत नाही. खाजगी रुग्णालयांना 25% लसींचा कोटा देण्यात आलेला आहे. या रुग्णालयाबरोबर  करार करून हा लससाठा महापालिकेने खरेदी करावा. आणि अल्प उत्पन्न गटाच्या लसीकरणासाठी तो वापरावा अशी आग्रही मागणी आमदार नाईक यांनी आजच्या बैठकीत केली.   माजी खासदार संजीव नाईक , माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक , सुधाकर सोनावणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

लस खरेदीसाठी महापालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले असले तरीही अद्याप त्यांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे पालिकेनेच थेट लस उत्पादक कंपन्यांकडे मागणी नोंदविण्याची सूचना नाईक यांनी  केली.

सीसीटीव्हीची निर्णय महासभेला घेऊ द्यावा

नवी मुंबईमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी महापालिकेने काढलेल कंत्राट 155 कोटी रुपयांवरून तब्बल 271 कोटी रुपयांवर गेल आहे.  कंत्राटाची वाढलेली रक्कम संशयास्पद असून सध्या सीसीटीव्हीची शहराला गरज नसल्याने हे कंत्राटच रद्द करावं मुंबई महापालिकेची महासभा अस्तित्वात येईल त्यावेळी लोकप्रतिनिधींना सीसीटीव्ही बाबतचा निर्णय घेऊ द्यावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली. सीसीटीव्हीचा निधी कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

शिक्षकांना प्रशिक्षण द्या,तज्ञांची समिती नेमा

कोरोनामुळे मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मात्र नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये त्यांना सुरळीत शिक्षण मिळेल याची खबरदारी महापालिकेने घ्यावी. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच तज्ञांची समिती नेमून कोरोना काळात कशाप्रकारे  गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल याची काळजी घ्यावी.

मयूकर मायकोसिससाठी टास्क फोर्स स्थापन करा

महाराष्ट्रात मयूकर मायकोसिस चे रुग्ण वाढत असून नवी मुंबईमध्ये या रोगाविषयी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याची सुचना लोकनेते नाईक यांनी बैठकीत केली. या रोगाचे सध्या 11 रुग्ण नवी मुंबईत असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली. डॉक्टर ,परिचारिका ,औषधे उपलब्ध ठेवण्याची सूचना नाईक यांनी केली. माजी आमदार संदीप नाईक यांनी मयूकर मायकोसिस उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर हे इंजेक्शन आणि त्याला पर्याय असणारे दुसरे इंजेक्शन आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येतील ,अशी ग्वाही आयुक्त बांगर यांनी दिली. 

कोरोना व्यतिरिक्त रोगांसाठी उपचाराची सोय निर्माण करा

महापालिकेने ऐरोली आणि नेरूळ येथील रुग्णालय कोरोना उपचारासाठी आरक्षित केली आहेत. पावसाळ्यामध्ये विविध साथींचे रोग पसरतात त्यामुळे अशा रुग्णांवर उपचाराची सोय पालिकेने या रुग्णालयांमधून उपलब्ध करावी.

कर वसुलीसाठी धाडलेल्या नोटिसा परत घ्या

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने नोटिसा पाठवल्या आहेत.  कोरोनाच्या आपत्ती काळात असे करणे उचित नाही त्यामुळे नागरिकांना कर भरण्यास मुदतवाढ देऊन या नोटिसा परत घ्या. अमनेस्टी योजना पुन्हा लागू करा.

बालकांसाठी आरोग्य व्यवस्था उभी करा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक संसर्गाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे त्यादृष्टीने त्यांच्यासाठी उपचाराच्या पुरेशा सुविधा निर्माण कराव्यात. डॉक्टर ,परिचारिका उपकरणे ,औषधे यांची सोय करावी तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ऑक्सीजन वेंटीलेटरचे बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावेत अशी मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी केली. त्यावर महापालिका बालकांसाठी पीआयसीयु उपचार कक्षाची निर्मिती पालिकेच्या रुग्णालयांमधून करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त बांगर यांनी दिली.

Read Previous

रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव 

Read Next

पहिल्याच पावसात एपीएमसी बाजार आवारात पाणी भरले