पोलीस आयुक्तांच्या बंगल्याशेजारी वाढताहेत झोपडपट्ट्या

पारसिक हिल दरड कोसळण्याची भिती 

नवी मुंबई ः पारसिक हिल्स परिसरात झोपडपट्ट्यांची वाढती संख्या, संग्रहण भिंतींचे कापले जाणे तसेच डोंगर कापण्याचे प्रकरण यासारख्या प्रकारांमुळे पारसिक हिल्सच्या रहिवासी भागाला दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी भिती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हिल्सच्या खाली डोंगर कापण्याची प्रक्रिया सुरु असल्याने डोंगर उतारावरील झोपडपट्ट्या आणि डोंगरावरील पाण्याच्या मोठ्या टाकीला देखील धोका निर्माण झाला आहे.

पारसिक हिल रहिवासी संघटना आणि ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'ने नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन सादर करुन सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. एकीकडे खुद्द नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या मागे आणि दुसरीकडे सायन-पनवेल महामार्गाजवळ डोंगरावर वाढत चालेल्या झोपडपट्ट्यांंकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही. सदर झोपडपट्टी मधील रहिवाशांचे नियमानुसार पुनर्वसन करणे गरजेचे आहे, असे ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन.कुमार यांनी सांगितले.

डोंगर उतारावरील झोपडपट्ट्या तेथे राहणाऱ्या लोकांसाठी आणि डोंगरासाठी देखील धोकादायक आहेत. ते सतत तो भाग खणत असतात, असे ‘पारसिक हिल रहिवासी असोसिएशन'चे अध्यक्ष जयंत ठाकूर म्हणाले. अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली इथे झोपडपट्ट्या चांगल्याच स्थिरावल्या आहेत. त्यांच्याकडे आता सोलार पाव्हर रुपस (सौर ऊर्जा छते) असून पाणी आणि वीजेचा अधिकृत पुरवठा होत आहे, असे रहिवासी विष्णू जोशी यांनी सांगितले.

‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी रहिवाशांच्या प्रतिनिधींसोबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन महापालिकेला पारसिक हिल्सच्या सभोवताली तात्काळ संग्रहण इमारत बांधण्याची विनंती केली. उभारलेल्या जल संचयाजवळचा डोंगराळ भाग सतत कापला जात आहे. ज्यामुळे टाकी देखील कोसळू शकते. खडकांमधाील प्रचंड मोठ्या पोकळ्यांमुळे सदर भाग अपघातप्रवण क्षेत्र बनत आहे, अशी बाब देखील रहिवाशांनी आयुक्त बांगर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर महापालिकातर्फे योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तानी दिले.

 20 वर्षांहून कमी वय असणारी झाडे दरड कोसळल्यामुळे आणि संततधार पावसामुळे उत्मळून पडत आहेत. आता आम्ही स्वदेशी फळझाडांच्या प्रजातींची लागवड करणार आहोत, ज्यामुळे जैवविविधता सुधारेल. त्यासाठी महापालिकेने मदत करण्याची विनंती याठिकाणी नियमीत वृक्षारोपणाचे नेतृत्व करणारे ‘पारसिक हिल रहिवासी असोसिएशन'चे सचिव राजेंद्र लोखंडे यांनी आयुवत बांगर यांना यावेळी केली.

दरम्यान, पारसिक हिल रहिवासी असोसिएशन आणि पर्यावरणवाद्यांनी पारसिक डोंगर उतारावर होणाऱ्या कापणाीबद्दल आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली पूर्ण वाढ झालेल्या झाडांच्या होत असलेल्या कत्तलीबद्दल धोक्याची घंटा वाजवली होती. त्यावर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वन विभागाला झालेल्या नुकसानीची तपासणी करण्याचे आदेश देऊन देखील कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी खंत बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्काडा नियंत्रण कक्षाच्या भिंतीला तडे ; सदर कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी