७७ नैसर्गिक नाल्यांच्या साफसफाईसाठी यंदा साडेचार कोटी रुपयांची कामे
‘नालेसफाई' कामात भ्रष्टाचार ?
वाशी ः नवी मुंबई महापालिका तर्फे नवी मुंबई शहरातील ७७ नैसर्गिक नाल्यांच्या साफसफाईसाठी यंदा साडेचार कोटी रुपयांची कामे देण्यात आली होती. मात्र, नालेसफाईच्या नावाखाली निव्वळ धूळफेक करण्यात आली असून, नालेसफाई फक्त कागदावरच दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ‘नालेसफाई' कामात महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ‘हातसफाई' करण्यात आली आहे का ?, असा प्रश्न उपस्थित करीत संबंधित दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी ‘पर्यावरण सेवाभावी संस्था' मार्फत करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरात एका बाजूला डोंगर कपार तर दुसऱ्या बाजूला खाडी असल्याने पावसाळ्यात जागोजागी पाणी तुंबण्याचे प्रकार नियमित घडतात. पावसाळ्यात औद्योगिक वसाहती मधील नाल्यातून डोंगरातील पाणी नवी मुंबई शहरात येते. त्याचवेळी पाऊस आणि खाडीची भरती एकाचवेळी झाल्यास मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य स्थिती नवी मुंबई शहरात निर्माण होते. त्यामुळे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करुन घेते. यंदा देखील नवी मुंबई शहरातील ७७ नैसर्गिक नाल्यांच्या मान्सूनपूर्व सफाईची कामे देण्यात आली असून, सदर कंत्राटे साडेचार कोटी रुपयांची आहेत. यावर्षी नवी मुंबई शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाई १०० टक्वे झाल्याचा दावा महापालिका द्वारे करण्यात आला आहे. मात्र, सदर दावा सपशेल खोटा ठरला आहे. नवी मुंबई शहरातील नाल्यांची जुजबी सफाई करुन कंत्राटदारांनी अनेक ठिकाणी नालेसफाई केल्याचे चित्र दिसत नाही. जवळपास ९० टक्के नालेसफाई झालेली नसल्याचे यंदा पावसाळ्यात नवी मुंबई शहरात साचलेल्या पाण्यावरुन स्पष्ट होत आहे. दस्तुरखुद्द नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी पाहणी केलेल्या नाल्यांची देखील पूर्ण साफसफाई झाली नसल्याने नालेसफाईच्या नावाखाली निव्वळ धूळफेक करण्यात आली आहे. तर काही नाल्यात सफाईचे सोंग करुन गाळ तसाच ठेवत पावसाची वाट बघण्यात आली. औद्योगिक वसाहतीमध्ये तर नालेसफाई झालेलीच नाही. ३० मे २०२२ नालेसफाई करण्याची अंतिम तारीख असताना १८ जून २०२२ पर्यंत नाल्यांमधील गाळ, झाडे, झुडपे ‘जैसे थे' होते. त्यामुळें ‘नालेसफाई'च्या नावाखाली ‘हातसफाई' करण्यात आली आहे का?, असा सवाल करत संबंधित दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी ‘पर्यावरण सेवा भावी संस्था'चे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.