मान्सून पूर्व.नालेसफाई मध्ये कुचराई ?
नवी मुंबई शहराला पावसाने झोडपून काढले
नवी मुंबई -:गेल्या चोवीस तासापासून नवी मुंबई परिसरात पावसाची संततधार सुरू असून शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे अवघे शहर जलमय झाले होते. मान्सून पूर्व.नालेसफाई मध्ये कुचराई केल्याने अवघ्या शहरातील रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक कोंडीची भीषण समस्या यानिमित्ताने निर्माण झाली होती. त्यामुळे शहरात दिवसभर जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र होते.
मागील दोन दिवसापासून नवी मुंबई बरसणाऱ्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. सोमवार सकाळी साडेआठ ते मंगळवार सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात १८२ मी.मी. तर मंगळवार दुपार पर्यंत ५७ मी.मी.पावसाची नोंद झाली होती. शहरातील एपीएमसी,औद्योगिक परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. महापे औद्योगिक परिसरात नैसर्गिक नाल्यात भराव टाकल्याने मिलेनियम बिजनेस पार्क परिसरात गुडघाभर पाणी भरले होते. त्यामुळे सुरक्षेच्या करणास्तव याठिकाणी मुख्य प्रवेशद्वार बंद करावे लागले आहे.
सायन पनवेल महामार्गावर जागोजागी पाणी साचल्याने वाहनांना द्राविडी प्राणायाम करत मुंगीच्या गतीने पुढे जावे लागत होते. एपीएमसी आवारात भाजी मार्केट, दाना बाजार परिसरात पाणी साचल्याने व्यापाऱ्यांना याचा फटका बसला आहे. गेल्या चोवीस तासात कोपर खैरणे सेक्टर १०.येथील किरकोळ आग लागण्याची एक घटना तर आठ ठिकाणी वृक्ष कोसळून पडल्याची नोंद आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज पाहता आपत्कालीन विभागाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. औद्योगिक परिसरात नाले सफाई न केल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यावर ओसंडन वाहून येत असल्याने महापे, पावणे, तुर्भे एमआयडीसी परिसराला अक्षरशः तलावाचे रूप आले होते. त्यामुळे शहरात पडलेल्या पावसामुळे मनपा प्रशासनाचा नालेसफाईच्या दाव्याचे पितळ यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे.मनपा प्रशासनाला पाणी उपसून काढण्यासाठी फौजफाटा तैनात करावा लागला आहे.नागरी वसाहतींना पावसाचा अद्यापी फटका बसला नाही.मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरावर संकटाचे सावट असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. औद्योगिक परिसरात विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. वाढत्या पावसाने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ठाणे बेलापूर रस्त्यावर देखील पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाल्याने चित्र पाहण्यास मिळाले. तर तुर्भे एम आय डी सी त रस्त्यातील पाण्यात एक ट्रक बंद पडल्याने एक दोन किलोमीटर वाहतूक कोंडी झाली होती.