प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च शिक्षणाची कास धरली पाहिजे - माधव पाटील 

शिक्षण समृद्ध जीवनाचा मार्ग- ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील 
 
पनवेल: शिक्षणाला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व असून शिक्षण समृद्ध जीवनाचा मार्ग आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च शिक्षणाची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन पनवेल तालुका पत्रकार विकास संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आज कष्टकरीनगर येथे केले. 
 
पनवेल तालुका पत्रकार विकास संस्थेचे सल्लागार डॉ. संजय सोनावणे यांच्या वाढदिवसाचे औचित्याने जिल्हा परिषदेच्या कष्टकरीनगर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
 
         यावेळी डॉ. संजय सोनावणे, संस्थेचे सदस्य संजय कदम, विवेक पाटील, हरेश साठे, सुनिल राठोड, संकेत भोईर, तुराडे ग्रामपंचायतीचे माजी उप सरपंच विश्वनाथ गायकवाड, शिक्षिका अनिता वाघमारे, शर्मिला उपरे, शिक्षक अशोक नेटके आदी उपस्थित होते. 
 
माधव पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले कि, आधुनिक युगात सर्व क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत आणि विशेषत्वाने शिक्षणातही स्पर्धा अधोरेखित होत आहे. 'शिकला तो टिकला' हि फक्त म्हण नसून जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. शिक्षण ही ज्ञानकौशल्य, मुल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे.यातून जात असताना काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीनुसार शिक्षण मिळते, मात्र दुर्लक्षित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे, या उद्दिष्टाने पनवेल तालुका पत्रकार विकास संस्थेच्या वतीने विधायक कार्य केले जाते. संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळेत अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जात असून यापुढेही विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 
 
          यावेळी डॉ. संजय सोनावणे यांनी बोलताना, दुर्गम भागात आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने सफल जीवनाचे उद्दिष्ट ठेवून शिक्षणाप्रती आस्था देवून कार्यरत रहावे, असे आवाहनही त्यांनी व्यक्त केले.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हेटवणे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे सिडकोने 25 टक्के पाणी कपातीचा निर्णय