दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
पनवेलमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “भरारी २०२२ – तुमच्या करिअरला द्या एक परिपूर्ण भरारी” शिबिर
पनवेल : एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित रायगड विभाग आयोजित दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर “भरारी २०२२ – तुमच्या करिअरला द्या एक परिपूर्ण भरारी” गुरुवार, दि. ७ जुलै २०२२ रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे, सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकरिता पनवेल तालुक्यातील सर्व एमएस-सीआयटी केंद्रांच्या माध्यमातून विनाशुल्क आयोजित केलेले आहे. अशी माहिती 'एमकेसीएल'चे कोंकण विभागीय समन्वयक जयंत भगत यांनी दिली आहे. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील नामवंत शिवव्याखाते, लेखक व करीअर मार्गदर्शक प्रशांत देशमुख हे विद्यार्थ्यांना या निमित्ताने मार्गदर्शन करणार आहेत. झी चोवीस तास या वृत्तवाहिनीवर पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमातून विविध व्याख्याने देणारे, स्टार प्रवाह या वाहिनीवरील “राजा शिव छत्रपती”, शिवधनुष्य या ऐतिहासिक कार्यक्रमात इतिहास अभ्यासक म्हणून सहभाग, डीएमई (डिप्लोमा इन मकॅनिकल इंजिनिअर), तसेच कला शाखेत एमए (मराठी), शिवचरित्रावरील ते गाढे अभ्यासक आहेत. आतापर्यंत राज्यस्तरावरील २०० पेक्षा जास्त वत्कृत्व, वादविवाद, कथाकथन स्पर्धेमध्ये यश, “ जय शिवराय”, “गुड मॉर्निंग” या पुस्तकाचे लेखक, प्रेरणादायी व्याख्याते यांचे अत्यंत प्रभावशाली व्याख्यान विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे.
एमकेसीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक दिपक पाटेकर हे प्रत्यक्ष कार्यानुभवातून पदवी कशी मिळवावी यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. बीबीए पासून ते बीएस्सी कम्प्युटर सायन्स या पदव्या देखील आपण काम करता-करता कशा मिळवू शकतो यासंदर्भात “कमवा आणि शिका” तसेच एमकेसीएलचे जॉब स्कील कोर्से (क्लिक कोर्स) या बद्दल आपल्याला माहिती कळू शकेल. तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सध्याच्या युगामध्ये डिजिटल स्किल्स फार महत्वाचे आहेत. एमकेसीएल च्या माध्यमातून एमएससीआयटी बरोबरच एकविसाव्या शतकामध्ये आवश्यक असलेल्या अत्याधुनिक डिजिटल स्कीलच्या अशाप्रकारे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर मोफत मार्गदर्शन करण्याचं काम एमकेसीएलच्या रायगड जिल्ह्यातील सर्व एमएस-सीआयटी आणि क्लिक सेंटरच्या माध्यमातून होत आहे. या शैक्षणिक मेजवानीचा दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन सर्व विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल - उरण तालुक्यातील सर्व एमएस-सीआयटी आणि क्लिक केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.