पनवेलच्या गाढेश्वर व मोर्बे धरणावर येणा-या पावसाळी पर्यटकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

गाढेश्वर व मोर्बे धरण व प्रबळगड आदी परिसरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त

नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील गाढेश्वर व मोर्बे धरण व प्रबळगड आदी परिसरात येणाऱया पावसाळी पर्यटकांची संख्या मोठी असल्याने या भागात कुठल्याही प्रकारची अनुचीत घटना अथवा दुर्घटना घडू नये यासाठी पनवेल तालुका पोलिसांनी या परिसरात  विशेष बंदोबस्त ठेवला आहे. तसेच पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱया पर्यटकांसाठी ठिकठिकाणी खास सुचना फलक लावून सदर सुचनांचे पालन करण्याचे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी केले आहे.  

पावसाळ्यात पनवेल तालुक्यातील गाढेश्वर व मोर्बे धरणाकडे जाणाऱया पर्यटकांची गर्दी मोठी असते. शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक धरण व त्याच्या ओढयामध्ये मौजमजा करण्यासाठी जात असतात. विकेन्ड अथवा एकदिवसीय सहलीसाठी नवी मुंबईसह मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांसाठी गाढेश्वर धरण उत्तम पर्याय आहे. पनवेल पासून 16 किमी अंतरावर माथेरानच्या पायथ्याशी पनवेल महापालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेल्या डोगंररांगा, त्यामध्ये धरणातुन धबधब्यासारख्या पडणाऱया पाण्यामुळे पर्यटक या धरणाकडे अधिक आकर्षीत होतात.  

मात्र अनेक पर्यटक हे मद्य सेवन करुन पाण्यात उतरत असल्यामुळे येथील पाण्यात बुडून मृत पावण्याचे प्रकार या भागात नेहमीच घडत असतात. सध्या येथील धरण आणि आजुबाजुच्या परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी या भागात कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडु नये यासाठी खबरदारी म्हणून या भागात चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्याशिवाय पोलिसांनी गाढेश्वर धरण व त्या भागात जाणाऱया मार्गावर पर्यटकांसाठी खास सुचना फलक लावले आहेत. तसेच जनतेच्या जिवीताच्या व सुरक्षेच्या दृष्टीने गाढेश्वर धरण, मोर्बे धरण, कुंडी धबधबा परिसरामध्ये पावसाळी पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.  

दरम्यान, कुणी व्यक्ती या भागात पोलिसांकडून देण्यात आलेल्या सुचनांचे उल्लंघन करताना आढळुन आल्यास त्यांची माहिती तत्काळ पनवेल तालुका पोलीस ठाण्यात देण्यात यावी असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याद्वारे करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन